जादूटोणा व अघोरी प्रथांचे गंभीर आरोप; ठाणे पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने फिरोज आदम शेख याला घेतले ताब्यात.
सावंतवाडी, दि. १२ जुलै
माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. फिरोज आदम शेख (वय ५३, रा. कोलगाव, सावंतवाडी) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव असून, ठाणे पोलिसांनी शनिवारी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांच्यासह इतरांविरुद्ध ठाणे विरार परिसरात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेने तिच्या फिर्यादीत फिरोज बाबा याच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विद्या केल्याचा आरोप केला आहे. त्या अनुषंगाने ठाणे पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी कोलगाव येथून संशयिताला ताब्यात घेतले.
लग्नापूर्वी स्वतःचा बंगला असल्याचे खोटे सांगून फसवणूक करणे, नपुसकत्व लपवण्यासाठी भोंदू बाबाच्या माध्यमातून अघोरी जादूटोणा करणे, तसेच मानसिक छळ व आर्थिक खच्चीकरण करणे, अशा गंभीर तक्रारी माजी खासदार विनायक राऊत यांच्या नगरसेवक मुलासह अन्य जणांविरोधात दाखल आहेत. नगरसेवक गितेश राऊत यांची पत्नी गिरिजा गीतेश राऊत यांनी दिलेल्या सविस्तर जबाबावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ठाणे विरार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.