सावंतवाडी,दि.१२ ऑगस्ट
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी १५ ऑगस्ट रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर पुकारण्यात आलेले उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्याने महासंघाने हा निर्णय घेतला आहे.
महासंघाच्या वतीने ३० जुलै रोजी १५ ऑगस्ट रोजी उपोषणास बसण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत परिवहन अधिकाऱ्यांनी उपोषणास न बसण्याबाबत महासंघाला पत्र दिले होते. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते.
या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक व मालकांच्या निवेदनावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान प्रमुख चार मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिले. त्यामुळे महासंघाने १५ ऑगस्टचे उपोषण तूर्तास स्थगित करत असल्याचे जाहीर केले असून, उपोषण मागे घेतल्याचे अधिकृत पत्रही जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे.
सीएनजी टाकी पासिंगची जबाबदारी कंपनीवर आहे .बजाज आणि टीव्हीएस कंपन्यांकडून सीएनजीवर चालणाऱ्या ज्या रिक्षा वितरित केल्या जातात, त्या कंपनीतून बाहेर पडताना सीएनजी किट बसवलेले असते. त्यामुळे टाकी पासिंग करताना त्याची जबाबदारी कंपनीनेच घेतली पाहिजे. यासंदर्भात बजाज व टीव्हीएस कंपनीच्या डीलर्सना बोलावून किंवा लेखी स्वरूपात आदेश देऊन टाकी पासिंगची सोय करण्याची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करावी, अशी सूचना करण्यात आली.
अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक बोर्डावर लावावेत असे सुचविले तेव्हा परिवहन कार्यालयाच्या आवारात ज्या सहाय्यक परिवहन अधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत, त्यांची नावे आणि संपर्कासाठी मोबाईल नंबर असणारा बोर्ड कार्यालयाच्या भिंतीवर तातडीने लावावा, अशी मागणी करण्यात आली.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी या सर्व मुद्द्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
या बैठकीला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर, कुडाळ तालुकाध्यक्ष रवींद्र माने, कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत, मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, उपाध्यक्ष सुनील पाताडे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष एकनाथ राऊळ, बांदा-दोडामार्ग तालुकाध्यक्ष राजेश बांदेकर, दोडामार्ग अध्यक्ष संतोष कळमकर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.