१७ वर्षांपासून मनोभावे पूजा; भजन, फुगड्या, सांस्कृतिक कार्यक्रमांसह आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई
सावंतवाडी,दि.२५ सप्टेंबर
महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या परदेशातील भूमीतही कोकणच्या मातीचा सुगंध आणि गणेशभक्तीचा गजर अनुभवायला मिळत आहे. सिंधुदुर्ग-मालवण परिसरातील युवकांनी शारजा येथे गेल्या तब्बल १७ वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जपत आपल्या मातृभूमीशी असलेली नाळ आजही कायम ठेवली आहे.
सन २००९ मध्ये या गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. परदेशात राहून आपल्या घरापासून आणि गावापासून दूर असताना गणरायाची स्थापना करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने मनात काहीशी धाकधूक होती. मात्र मित्रपरिवाराच्या सहकार्याने पहिला गणेशोत्सव भक्तिभावाने, भक्तीमय वातावरणात साजरा झाला आणि त्यानंतर ही परंपरा दरवर्षी अधिक उत्साहाने पुढे सुरू राहिली.
गणेशोत्सवानिमित्त गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा, आरती आणि भजनांचे आयोजन केले जाते. गणेशमूर्ती परिसराची आकर्षक सजावट, विविध देखावे तसेच रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघतो. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित देखावे सादर केले जात असल्याने गणेशोत्सवाचे आकर्षण अधिक वाढते.
गावाकडील गणेशोत्सवाची आठवण करून देणाऱ्या फुगड्या, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध धार्मिक उपक्रमांमुळे शारजामध्येही कोकणातील उत्सवाचे वातावरण निर्माण होते. तब्बल अकरा दिवस हा गणेशोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.
या उत्सवात महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, गोवा तसेच गुजरातमधील अनेक युवक – युवती सहभागी होतात. नोकरी आणि व्यवसायानिमित्त दुबई-शारजा परिसरात वास्तव्यास असलेले हे युवक गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. परदेशात राहूनही गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे हा सण साजरा करतात.
जया गुप्ता आणि अमित मालवणकर यांनी सांगितले की, २००९ मध्ये पहिल्यांदा गणेशमूर्तीची स्थापना केली तेव्हा मनात थोडी भीती होती. मात्र मित्रपरिवाराच्या सहकार्याने पहिला गणेशोत्सव यशस्वीपणे पार पडला. त्यानंतर दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. परदेशात राहूनही गणेशोत्सवाच्या काळात आपण आपल्या गावात आणि देशातच असल्यासारखे वाटते आणि सर्वजण आपुलकीने एकत्र येतात.गावाप्रमाणेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.”
या उपक्रमात एलियन्स प्लास्टिक कंपनीच्या जया गुप्ता आणि त्यांचे कुटुंब तसेच सिंधुदुर्ग-मालवणचे अमित मालवणकर यांचा विशेष सहभाग आहे. त्यांच्या पुढाकारातून आणि सहकार्याने गेली १७ वर्षे गणेशोत्सवाची ही परंपरा मोठ्या उत्साहाने अखंड सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या अखेरीस गणरायाचे विसर्जन समुद्रकिनारी करण्यात येते. परदेशात राहूनही आपल्या संस्कृतीशी जोडून राहण्याचा हा उपक्रम नव्या पिढीसाठीही खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे.
शारजाच्या भूमीत गणेशोत्सवाच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या मातीतील भक्ती, कोकणची संस्कृती आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या युवक युवतींचे सर्वत्र कौतुक होत आहे.