शहराच्या मध्यवर्ती भागातील भरवस्तीत बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; काही नागरिकांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले.
सावंतवाडी,दि.०८ऑक्टोंबर
सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती भागातील खासकीलवाडा परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास भरवस्तीत बिबट्या दाखल झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्या थेट शहरात शिरल्याने आणि काही नागरिकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिल्याने परिसरात तीव्र घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री खासकीलवाडा भागात हा बिबट्या फिरताना दिसून आला. तेथून राजवाड्याच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट झाडीचा फायदा घेत त्याने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बिबट्या वस्तीत आल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. या शोधमोहीमेत कोलगावचे वनरक्षक अक्षय कुंभार, माजगावचे सुनील चोथे, मळगावचे सुनील गडदे, तसेच ‘आरआरटी’चे शुभम फाटक, तुषार सावंत यांच्यासह वनविभागाची टीम सहभागी झाली आहे. वनविभागाकडून परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.