सावंतवाडी : माडखोल देऊळवाडी येथे एअरटेल टॉवरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा; वीज ग्राहकांचे आंदोलनाचा इशारा

शेअर करा

सावंतवाडी ,दि.२४ सप्टेंबर
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल देऊळवाडी येथील पावणाई मंदिर परिसरात असलेल्या वीज रोहित्रावरून (ट्रान्सफॉर्मर) नवीन उभारण्यात आलेल्या एअरटेल टॉवरला वीज पुरवठा देण्यात आला आहे. यामुळे परिसरातील सामान्य वीज ग्राहकांना कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) वीजपुरवठ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर वीज कंपनीने तात्काळ उपाययोजना करून नवीन २०० वॅट रोहित्र बसवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
​या संदर्भात महावितरणच्या अधिक्षक अभियंता,सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. माडखोल देऊळवाडी येथील पावणाई मंदिर परिसरातील रोहित्राबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी करूनही वीज मंडळाने याची कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी, नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव काळात या भागात अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा झाला.
​वीज यंत्रणेतील या सततच्या चढ-उतारामुळे (हाय-लो व्होल्टेज) घरातील टीव्ही, फ्रिज, घरघंटी यांसारखी महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार संतप्त नागरिकांनी केली आहे. सध्या स्थितीत असलेल्या रोहित्राऐवजी १०० केव्हीए ऐवजी २०० केव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र तात्काळ बदलून द्यावे, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
​या निवेदनावर कृष्णकांत माडखोलकर, राहुल माडखोलकर, शुभम माडखोलकर, आयुष नाईक, विठ्ठल परब, नागेश सावंत, अनिल राऊळ, सूर्यकांत राऊळ, संजय लाड, महेश राऊळ, राघवेंद्र नाईक, गौरेश झेमने, अजित लाड, शुभांगी राऊळ, रोहित लाड, लक्ष्मण राऊळ, महादेव राऊळ यांच्यासह देऊळवाडी परिसरातील असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत. वीज कंपनीने यावर तातडीने कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

शेअर करा