सावंतवाडी दि.११ ऑगस्ट
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे जानेवारी महिन्यापासून ‘सुप्रसिद्ध साहित्यिक कै.कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम’ राबवला जात आहे. सहभागी वाचक दरमहा एक पुस्तक वाचून त्यावर परीक्षण लिहीत आहेत. जून महिन्यातील काव्यसंग्रह या साहित्य प्रकारात ऐरोली-ठाणे येथील माधुरी प्रकाश आठल्ये यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर शिरोड्यातील निलम कांबळे यांना द्वितीय आणि उभादांडा- वेंगुर्ल्यातील विशाखा वेंगुर्लेकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. माधुरी आठल्ये यांनी संदिप खरे यांच्या ‘मौनाची भाषांतरे’ या काव्यसंग्रहाचे परीक्षण केले होते.
या उपक्रमांतर्गत प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी संजीवनी पाटील व मधुकर मातोंडकर संपादित सिंधुदुर्गातील नवीन कविता, सरोज रेडकर यांनी मंगेश पाडगावकर यांचा धारानृत्य, अरुण धर्णे यांनी कवी गिरीश यांचा मानसमेघ, निलम कांबळे यांनी मनीषा पाटील यांचा काहूर, स्नेहा नारींगणेकर यांनी सरिता पवार यांचा राखायला हवी निजखूण, वैभवी रायशिरोडकर यांनी शिरीष पै यांचा माझे हायकू, अर्चना लोखंडे यांनी नितिन तेंडुलकर यांचा झाड, विशाखा वेंगुर्लेकर यांनी कुसुमाग्रज यांचा विशाखा आणि विनय सौदागर यांनी चंद्रकांत पाटील संपादित दृश्यांतर आदी काव्यसंग्रहाचे परीक्षण करण्यात आले.
कुडाळ येथील चोखंदळ वाचक प्रसाद रेगे यांनी पुरस्कृत केलेल्या या उपक्रमासाठी सावंतवाडी येथील सुप्रिया दिलीप गोडकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. या उपक्रमाच्या संयोजनाचे काम विनय सौदागर यांनी पाहिले.