सावंतवाडी : महिमतगड माणसांनी आणि झाडांनी फुलला!

शेअर करा

दुर्ग महिमतगड प्रतिष्ठानच्या वृक्षारोपण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० वृक्षांचे रोपण

सावंतवाडी,दि.१० ऑगस्ट

संगमेश्वर तालुक्यातील देवरुखपासून जवळच असलेल्या शिवकालीन महिमतगडावर दुर्ग महिमतगड प्रतिष्ठान, निगुडवाडी यांच्या वतीने वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हिरवा वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने ९ ऑगस्ट २०२६ रोजी हा उपक्रम उत्साहात पार पडला.

गावचे पाटील आत्माराम गुरव यांनी सतीच्या माळावर गडावरील सर्व देवदेवतांना श्रीफळ अर्पण करून जाबजबानी केली आणि त्यानंतर वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात झाली.

या उपक्रमात निगुडवाडी गावातील मानकरी, दुर्ग महिमतगड प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच ४५ ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. याशिवाय रत्नागिरी येथील फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीचे १३ विद्यार्थी, तसेच देवरुख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे (A.S.P.) कॉलेजचे ४२ विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले. एकूण सुमारे १०० ते ११० जणांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला.

या वेळी गड परिसरात वड, पिंपळ, आवळा, जांभूळ, फणस, आंबा, बेल, करंज, रातांबा, गुलमोहर आदी विविध प्रजातींच्या तब्बल २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. गडाच्या ऐतिहासिक वैभवाला निसर्गाच्या हिरवाईची जोड देण्याचा हा उपक्रम ठरला.

वृक्षारोपणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार करण्यात येत होता. घोषणांनी संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेल्याने वातावरण चैतन्यमय झाले होते.

दुर्ग महिमतगड प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनाला ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सहभागींचे आभार मानले. महिमतगड माणसांनी आणि झाडांनी फुलविण्याच्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच ऐतिहासिक वारशाच्या जतनाचा संदेश देण्यात आला.

शेअर करा