​सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची मोठी तूट; मुळदे केंद्राच्या अहवालानुसार पर्जन्यमानात १४६५ मिमीची घट

शेअर करा

​सावंतवाडी,दि.२५ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी राहिल्याचे समोर आले आहे. उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे (ता. कुडाळ) येथील ‘ग्रामीण कृषि मौसम सेवा’ केंद्राने जारी केलेल्या २५ सप्टेंबर पर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्यात यंदाच्या मोसमात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ४० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
​मिळालेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२६ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात २१८०.० मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत (१ जानेवारी २०२५ ते २५ सप्टेंबर २०२५) तब्बल ३६४५.६ मिमी पाऊस झाला होता. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १४६५.६ मिमी पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. दरम्यान, २०२५ या संपूर्ण वर्षात जिल्ह्यात एकूण ४०४७.५ मिमी पाऊस झाला होता.
​पर्जन्यमानासोबतच तापमानातही वाढ झाली आहे. मागील २४ तासांत २५.६ मिमी पावसाची नोंद झाली असून कमाल तापमान ३२.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गतवर्षी याच तारखेला कमाल तापमान ३०.० अंश तर किमान तापमान १९.० अंश सेल्सिअस होते. म्हणजेच यंदा किमान तापमानात ५ अंशांची वाढ झाल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे.
​तसेच गेल्या २४ तासांत हवेतील सकाळी आर्द्रता ९८ टक्के आणि दुपारी ८५ टक्के राहिला, तर वाऱ्याचा वेग ताशी १.३ किमी होता. बाष्पीभवन १.६ मिमी प्रतिदिवस आणि सूर्यप्रकाश २ तास नोंदवला गेला.
​पावसातील ही मोठी तूट आणि तापमानातील वाढ यामुळे भातशेतीसह आंबा, काजू आणि नारळी-सुपारीच्या बागांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास आगामी काळात जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

शेअर करा