सावंतवाडीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनीही राजीनामे द्यावेत…

शेअर करा

रुपेश राऊळ आक्रमक;सक्षम असाल तर भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून दाखवा…

​सावंतवाडी,दि.०९ऑक्टोबर

येथील नगरपालिकेत झालेल्या पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारात केवळ संबंधित सभापतींचा राजीनामा घेऊन हा विषय संपणारा नाही, तर याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्षा श्रद्धा भोसले आणि उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनीही तात्काळ आपल्या पदांचे राजीनामे दिले पाहिजेत, अशी आक्रमक मागणी ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश राऊळ यांनी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे तीव्र ताशेरे ओढले. सावंतवाडी नगरपालिकेसह परिसरातील विविध संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचे पेव फुटले असून सध्याचे पालिका प्रशासन भ्रष्टाचारात पूर्णपणे रुतले आहे, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
​पत्रकार परिषदेत राऊळ म्हणाले की, या गैरव्यवहाराला जबाबदार असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे. केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता या प्रकारामुळे अकार्यक्षमता चव्हाट्यावर आली आहे. स्वतःच्या कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार करायला लावायचा आणि नंतर तो पचवायला साथ द्यायची, असाच कारभार सध्या सुरू आहे. सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना राऊळ यांनी थेट आव्हान दिले की, जर या मतदारसंघाचे पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि खासदार खरोखरच सक्षम असतील, तर त्यांनी संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून दाखवावी. या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख राजेश शेटकर, अशोक धुरी, आबा केरकर, गोकुळदास मोटे यांच्यासह ठाकरे सेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा