​​सावंतवाडी : वादळग्रस्त चौकुळ गावाला आमदार दीपक केसरकर यांच्याकडून तातडीने आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंची मदत

शेअर करा

सावंतवाडी, दि. ६ जुलै

तालुक्यातील चौकुळ गावातील मऱ्हाटवाडी-बेरडकी येथे शनिवारी पहाटे झालेल्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळात अनेक घरांवरील छप्परे आणि पत्रे उडून गेल्याने नागरिक संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी रविवारी तातडीने दुर्घटनाग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली आणि आज नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवून दिलासा दिला.
​आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार आणि शिवसेना पक्षाच्या वतीने चौकुळ येथील म्हाऱ्याटीवाडी बेरडकी (बेरड समाज) भागातील बाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत सुपूर्द करण्यात आली. पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव आणि शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्या हस्ते या मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी, सर्व ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.
​रविवारी पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना तातडीने पंचनामे करून शासकीय मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. जेणेकरून पीडित कुटुंबांना प्रशासकीय स्तरावरूनही तातडीने आर्थिक पाठबळ मिळू शकेल.
​या मदतकार्यात शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शाखाप्रमुख अभिजीत मेस्त्री, युवा सामाजिक कार्यकर्ते आनंद (नंदू) गावडे, बबन रेडकर, धनंजय गावडे, निखिल गावडे, यश गावडे, साई नाईक, उत्तम नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत मदत पोहोचवली. संकटाच्या काळात अशा प्रकारे धावून जात गरजूंना मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

शेअर करा