​सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातील ३३ केव्ही वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी

शेअर करा

सावंतवाडी,दि.१० जून
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ३३ केव्ही वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या महत्त्वपूर्ण कामाला तात्काळ मंजुरी देऊन त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी माजी मंत्री,आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका भेटीदरम्यान केली आहे. या संदर्भातील सविस्तर मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केले.
​आमदार दीपक केसरकर यांनी दिलेल्या पत्रानुसार, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बहुतांश भाग हा अत्यंत दुर्गम, डोंगराळ आणि दाट जंगलांनी वेढलेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळणे आणि अतिवृष्टी होण्याचे प्रमाण असते. यामुळे जंगलातून गेलेल्या वीज वाहिन्यांवर सातत्याने झाडे किंवा त्यांच्या फांद्या पडून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. तसेच या भागातील लोखंडी पोल, फॅब्रिकेशन, डीटीसी स्ट्रक्चर जुने आणि सडलेले असून वीज वाहक तारा तुटण्याचे प्रमाणही जास्त आहे.


​रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणे धोकादायक
​हा भाग पूर्णपणे डोंगराळ आणि जंगलाचा असल्याने रात्रीच्या वेळी ‘लाईन फॉल्ट’ शोधण्यासाठी पेट्रोलिंग करणे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत जोखीमयुक्त ठरते. यामुळे वीज पुरवठा पूर्ववत करण्यास मोठा विलंब होतो आणि नागरिकांना अंधारात राहावे लागते. या समस्येमुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत असून, वारंवार आंदोलने व उपोषणे केली जातात. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला सतत जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे केसरकर यांनी पत्रात नमूद केले आहे.


​प्रस्ताव प्रलंबित असल्याने मुख्यमंत्र्यांकडे धाव:
​या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ३३ केव्ही वीज वाहिन्या भूमिगत करणे हाच एकमेव पर्याय आहे. याबाबत महावितरणच्या सिंधुदुर्ग मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी यापूर्वीच सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांच्या ऊर्जा विभागाकडे सादर केला होता. मात्र, या प्रस्तावावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सद्यस्थितीत पावसाळा सुरू झाला असून वीज खंडित होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे.


​त्यामुळे जनतेची ही गैरसोय लक्षात घेऊन, सावंतवाडी मतदारसंघातील ३३ केव्ही वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

शेअर करा