​​सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सक्षमीकरणासाठी आमदार दीपक केसरकर आक्रमक; आरोग्यमंत्र्यांकडे केली विविध मागण्यांची निवेदने

शेअर करा

आंबोलीत ‘आयुष वेलनेस क्लिनिक’ तर रेडी येथे ‘विशेष आयुष केंद्र’ स्थापन करण्यासाठी निधी देण्याची आग्रही मागणी

सावंतवाडी,दि.१० जून
सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांची विशेष भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य विभागातील रिक्त असलेली वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरण्यासंदर्भात तसेच जिल्ह्यातील आरोग्य सुविधां चा दर्जा उंचावण्यासाठी सविस्तर चर्चा करून आग्रही मागणी केली.


​सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील सर्वोच्च स्वच्छ जिल्हा असून पर्यटनाच्या दृष्टीने या जिल्ह्याला मोठी प्रसिद्धी लाभली आहे. येथे येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे, ही बाब आमदार केसरकर यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
​या भेटीदरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या दोन प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा व आंबोली येथे ‘Ayush Wellness Clinic’: राष्ट्रीय आयुष अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी स्वास्थ्य क्लिनिक (Co-location of Ayush Facilities at PHCs) स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. या अंतर्गत आंबोली येथे आयुष वेलनेस क्लिनिकच्या बांधकामासाठी १५ लाख रुपये आणि साहित्य व उपकरणांसाठी ५ लाख रुपये, असे एकूण २० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच इतर दोन केंद्रांसाठी प्रति केंद्र ४६.६० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता प्रतिपादन करण्यात आली आहे.

​ रेडी (तालुका वेंगुर्ला) येथे ‘विशेष आयुष केंद्र’: रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ विशेष आयुष केंद्र बांधण्यासाठी १० गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये पंचकर्म व इतर आयुष उपचारांशी निगडीत सेवा पुरवल्या जाणार आहेत. या विशेष केंद्राच्या बांधकामासाठी, नूतनीकरणासाठी, फर्निचर व उपकरणांसाठी ७५ लाख रुपये आणि आवर्ती अनुदानांतर्गत औषधे व इतर वस्तूंसाठी ५.२० लाख रुपये, असा एकूण ८०.२० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.


​वैद्यकीय पर्यटनाला (Medical Tourism) मिळणार चालना:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गसौंदर्यासोबतच आयुर्वेद, पंचकर्म, योग आणि निसर्गोपचार यांसारख्या भारतीय उपचार पद्धतींना प्रोत्साहन दिल्यास येथील वैद्यकीय पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर वसलेल्या या भागात आरोग्याच्या आधुनिक व पारंपरिक सुविधा निर्माण झाल्याने पर्यटकांचा ओघ अधिक वाढेल, असा विश्वास आमदार केसरकर यांनी व्यक्त केला आहे.
​या संपूर्ण कामाचा सविस्तर आणि परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य समिती, जि. प. सिंधुदुर्ग यांच्यामार्फत शासन स्तरावर सादर करण्यात आला आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा वेळेत मिळाव्यात, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे युद्धपातळीवर भरली जावीत आणि या नाविन्यपूर्ण आरोग्य प्रकल्पांना त्वरित मंजुरी देऊन निधी वितरित करावा, अशी आग्रही मागणी आमदार केसरकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.

शेअर करा