सावंतवाडी पालिकेत पावसाळा नियोजनाची बैठक; खोदलेले चर ५ दिवसांत बुजविणार, कंत्राटदारांची ग्वाहीनगराध्यक्षा सौ श्रध्दा लखम सावंत भोसले

शेअर करा

सावंतवाडी,दि.९ जून
शहरातील रस्ते, गटारे, नाले आणि आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेऊन पावसाळा पूर्व नियोजन करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आज (दि. ९ जून) एक महत्त्वाची बैठक पार पडली. नगराध्यक्ष सौ. श्रद्धा लखम सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या वेळी सर्व सभापती, नगरसेवक, पालिका अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामांचे कंत्राटदार उपस्थित होते.


​या बैठकीमध्ये संबंधित प्रभागाच्या नगरसेवकांनी आपापल्या भागातील विविध समस्या मांडल्या. शहरात गॅस पाईपलाईन (एमएनजीएल) तसेच पाणी पुरवठा योजनेसाठी ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. हे खोदलेले चर बुजविणे आणि रिस्टोरेशनच्या (रस्ते पूर्ववत करणे) कामाबाबत नियुक्त कंत्राटदारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर, “येत्या पाच दिवसांत ही सर्व कामे पूर्ण करून दिली जातील,” अशी ग्वाही संबंधित ठेकेदारांनी बैठकीत दिली.


​ट्रॅफिक आणि अतिक्रमणावर होणार कारवाई:
​बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी (ट्रॅफिक) आणि ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण या विषयावरही सविस्तर चर्चा झाली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नगरपरिषदेने नेमलेल्या पथकामार्फत या सर्व जागांचे तातडीने सर्व्हेक्षण केले जाईल. संबंधितांना नोटीस बजावून सात दिवसांत यावर अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच एमएनजीएलच्या कामातील निष्काळजीपणाबाबत थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला जाईल, असेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.


​धोकादायक झाडे व डास प्रतिबंधक फवारणीला प्राधान्य द्या:
​पावसाळा सुरू झाला असल्यामुळे नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. शहरातील धोकादायक झाडे हटवणे, स्ट्रीट लाईटच्या समस्या सोडवणे, गटारात साचलेले पाणी उपसणे, डास प्रतिबंधक फवारणी करणे, तसेच मोकाट कुत्रे व इतर जनावरांचा बंदोबस्त करणे ही कामे प्राधान्याने आणि नियोजित वेळेत पार पाडावीत, असे आदेश नगराध्यक्षा सौ श्रध्दा लखम सावंत भोसले यांनी दिले. सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांना सूचना देऊन या बैठकीची सांगता करण्यात आली.


यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर, , महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर,पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उद्यान आणि पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, नगरसेवक सुकन्या टोपले, नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, तौकीर शेख, देवेंद्र टेमकर आदी नगरसेवक, सर्व अधिकारी उपस्थित होते

शेअर करा