सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीच्या कुडाळमधील कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराला मुलांचा उदंड प्रतिसाद!

शेअर करा

सावंतवाडी,दि. ६ जुलै

सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने कुडाळमधील लहान मुलांमध्ये कॅरम व बुदधिबळ खेळांची आवड निर्माण करण्यासाठी मराठा समाज हाॅलमध्ये आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबीरात मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. शिबीरात कुडाळ शहर, तालुका आणि कणकवली येथील पाच वर्षापासून पुढील एकशे चोवीस मुली आणि मुलांनी सहभाग घेऊन खेळाचे प्राथमिक शिक्षण घेतले. मुक्ताई ॲकेडमीतर्फे कुडाळ येथे पहिल्यांदाच शिबीर घेण्यात आले. शिबीराचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपंचायत गटनेते विलास कुडाळकर, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, रामचंद्र परब सर, संवाद मिडीया न्युज चॅनेल ब्युरो चीफ विभावरी पालव, सीए वालावलकर मॅडम, केंद्र प्रमुख वारंग सर, कोकण नाऊ न्युज चॅनेल प्रतिनिधी निलेश जोशी, उन्मेष शेट्ये, गुरुप्रसाद सावंत सर, अनंत राणे सर, आगलावे सर, बुदधिबळ मार्गदर्शक मयुरेश मालवणकर, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेल्या कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी उपस्थित रहाणे शक्य नसल्याने फोनवरुन शुभेच्छा दिल्या.

                                         कौस्तुभ पेडणेकर यांनी ॲकेडमीच्या गेल्या दहा वर्षातील कार्याचा परिचय करुन दिला. ॲकेडमीचे विदयार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिकप्राप्त असून बत्तीस विदयार्थ्यांनी बुदधिबळ खेळात आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सलग तीन वर्षे "बेस्ट ॲकेडमी" पुरस्कार मिळवणारी ही कोकणातील एकमेव ॲकेडमी असल्याचे ते म्हणाले. विभावरी पालव यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. उदघाटनप्रसंगी बोलताना काका कुडाळकर यांनी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांचे कौतुक केले. ॲकेडमी मुलांसाठी करत असलेल्या उपक्रमात पालकांनी मुलांच्या खेळातील आवड ओळखुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. यावेळी काकांनी सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक सुर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांनी सत्तावीस वर्षे असोसिएशन आणि कॅरम खेळासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करुन दिली. कौस्तुभ आणि बाळकृष्ण हा वारसा पुढे चालवत आहेत याचा अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं. मुक्ताई ॲकेडमीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन कॅरम चँपियन आणि बुदधिबळ ग्रँडमास्टर घडवावा असे देखील ते म्हणाले. ॲकेडमीला लागणारी मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं.

                                       ॲकेडमीचे विदयार्थी, सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर आणि मालवणचा मयुरेश मालवणकर हे मागील महिन्यात जिल्ह्यातील पहिले, महाराष्ट्र राज्य बुदधिबळ असोसिएशनचे राज्य पंच म्हणजे आर्बिटर झाले. यावेळी काका कुडाळकर यांच्या हस्ते मयुरेश मालवणकर याचा सत्कार करण्यात आला. यावेळी कौस्तुभ पेडणेकर यांनी कॅरम खेळातील बारकावे आणि मयुरेश मालवणकर यांनी बुदधिबळचे प्राथमिक तंत्र याचे प्रशिक्षण दिले. तसेच ॲकेडमी, शालेय आणि असोसिएशनतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धा, त्यामधून मिळणारे गुण, होणारे फायदे याविषयी शिबीरात मार्गदर्शन करण्यात आले. विदयार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन समीर राऊळ सरांनी केले.

शेअर करा