सावंतवाडी,दि.२८ सप्टेंबर
सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये आलेल्या संशयास्पद बिलांची वेळेवर शहानिशा करून आपण मोठा भ्रष्टाचार रोखला आहे, असा दावा पाणीपुरवठा समितीचे सभापती सिताराम उर्फ प्रतिक बांदेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे. तसेच विरोधकांकडून राजकीय वैमनस्यातून व द्वेषबुद्धीने आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा पलटवारही त्यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बांदेकर यांनी नमूद केले आहे की, पाणीपुरवठा सभापती म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर कामकाजादरम्यान ८ जून २०२६ रोजी रु. ७,५०,७६२ आणि रु. ९,८७,९४४ अशी दोन संशयास्पद बिले सादर करण्यात आली होती. या बिलांमध्ये सरासरीपेक्षा फार मोठी वाढ दिसून आल्याने त्यांचा लेखी कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर पाणीपुरवठा समितीसमोर ३ वेगवेगळ्या रकमांचे अहवाल सादर झाले.
हिशोब आणि ताळेबंद न जुळल्याने सभापती बांदेकर व समिती सदस्यांनी ८ ऑगस्ट २०२६ रोजी नगरपरिषद आणि जनतेच्या हिताचा विचार करून, अहवाल सादर झाल्याशिवाय बिल अदा करू नये, असे पत्र मुख्याधिकारी व सर्व समिती सदस्यांना दिले.
१८ ऑगस्ट २०२६ रोजी नळसामान रजिस्टर आणि बिलांमध्ये तफावत असल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने मान्य केले. या प्रकरणात जोडारी कर्मचारी मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नळसामान रजिस्टर गहाळ झाल्याची माहिती मिळाल्यावर, सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता संबंधित कर्मचारी रजिस्टर हाताळताना व घेऊन जाताना दिसून आला.
हा अहवाल स्थायी समितीमध्ये पाठवल्यानंतर नगराध्यक्षांनी तात्काळ चौकशी व गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याआधारे प्रशासनाकडून फिर्यादी पोईपकर यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
विरोधाकांचे आरोप म्हणजे राजकीय स्टंट:
“वेळेचे भान राखत बिलांचे प्रदान थांबवल्यामुळे आजपर्यंत विवादग्रस्त बिल अदा झालेले नाही व होणारा भ्रष्टाचार टळला आहे,” असे बांदेकर यांनी स्पष्ट केले. परंतु, या कामाचे कौतुक करण्याऐवजी विरोधकांनी कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता राजकीय स्टंट म्हणून बिनबुडाचे आरोप केले आहेत. पारदर्शक कामाची सवय नसलेले विरोधक राजकीय वैमनस्यातून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
नगरसेवक, सभापती व भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. मात्र, कोणतेही विकासात्मक धोरण नसलेले विरोधक प्रसिद्धीझोतात येण्यासाठी खोटे आरोप करून न.पा. व भाजप नगरसेवकांना बदनाम करत आहेत. सावंतवाडीची जनता विरोधकांच्या या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त करत या संदर्भातील सर्व कागदपत्रे व पुरावे सोबत जोडले असल्याचे बांदेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.