संजू परबांची सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याची मागणी; चौकशी-अंकेक्षण करून दोषींवर कारवाईचे नगराध्यक्षांचे आश्वासन
सावंतवाडी, दि. १० सप्टेंबर
सावंतवाडी नगरपरिषदेच्या मासिक बैठकीत पाणीपुरवठा विभागातील गहाळ रजिस्टर आणि विविध कामांच्या अवास्तव खर्चावरून भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी या कथित भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली. यावर शहराचा सर्वांगीण विकास साधताना भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही; या प्रकरणाची सखोल चौकशी आणि ऑडिट करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांनी दिले.
स्थानिक लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक बैठक पार पडली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. बैठकीत विविध विकासकामांवर चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आले. मात्र, आयत्या वेळच्या विषयात पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित होताच सभागृहात जोरदार चर्चा झाली.
मुख्याधिकारी अहवाल का देत नाहीत? नगरसेवकांचा सवाल:
नगरसेवक देव्या सूर्याजी, ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगावकर, देवेंद्र टेमकर, ॲड. नीता कविटकर-सावंत आणि बाबू कुडतरकर यांनी पाणीपुरवठा विभागातील गोंधळावर प्रशासनाला धारेवर धरले. पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी १० लाख, १७ लाख आणि २३ लाख रुपये असा अवास्तव खर्च दाखवून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शर्वरी धारगळकर यांनी केला. तसेच ठराव होऊनही गहाळ रजिस्टरबाबत एफआयआर (FIR) का दाखल केली जात नाही आणि मुख्याधिकारी चौकशी अहवाल का सादर करत नाहीत, असा सवाल देव्या सूर्याजी यांनी उपस्थित केला.
केवळ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा करू नका: संजू परब
चर्चेदरम्यान प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संजू परब आक्रमक झाले. ते म्हणाले, “या प्रकरणात केवळ लहान कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा न बनवता मूळ दोषींवर कारवाई झाली पाहिजे. सभापती प्रतीक बांदेकर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा.”
प्रशासक काळातील तो गैरप्रकार: सभापती प्रतीक बांदेकर
संजू परब यांचा आरोप खोडून काढताना सभापती प्रतीक बांदेकर यांनी स्पष्ट केले की, “हा प्रकार उघडकीस येताच आम्ही सर्व बिले रोखण्याचे आदेश दिले होते. प्रशासक काळात बजेटपेक्षा जास्त बिले अदा करण्यात आली आहेत. गहाळ रजिस्टरबाबत तक्रार दाखल करण्यासाठी मी स्वतः नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आहे. मी स्वतःच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली असून पाणी पुरवठा समितीने त्याला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
सखोल चौकशी आणि ऑडिट होणार: नगराध्यक्षा श्रद्धा भोसले
विषयाचे गांभीर्य लक्षात घेत नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी स्पष्ट भूमिका घेतली. “आम्हाला बापूसाहेब महाराजांचा वारसा लाभला आहे. नगरपरिषदेत कसलाही भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आणि ऑडिट केले जाईल. जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.