शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा ॲड. नीता कविटकर-सावंत यांचा गंभीर आरोप; सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याची मागणी
सावंतवाडी,दि.१० सप्टेंबर
सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या बिलांमध्ये प्रचंड तफावत आणि गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका ॲड. नीता कविटकर-सावंत यांनी केला आहे. या प्रकरणी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी अजिबात गंभीर नसून, केवळ कर्मचाऱ्यांना बळी न पाडता यामागील “मोठे मासे” शोधण्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असा इशाराही त्यांनी दिला.
नगरपरिषदेच्या मासिक बैठकीत या विषयावरून जोरदार वादळी चर्चा झाली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक खेमराज कुडतरकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, देव्या सूर्याजी, अजय गोंदावळे आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे व आरोप:
ॲड. नीता कविटकर-सावंत: पाणी पुरवठा योजनेच्या बिलांमधून लाखो रुपये जिरवले जात आहेत. नगरपरिषदेचे पाणी पुरवठा रजिस्टरच गहाळ झाले असून ते सापडत नाही. श्रेयस मुंज यांनी नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात अर्धनग्न आंदोलन केले होते; त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. नगरपरिषदेच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. नगराध्यक्षा व मुख्याधिकारी पाणी पुरवठा योजना विषयावर कोणतीही ठोस चौकशी करत नसल्याने यात मोठ्या व्यक्तींचा हात असल्याचा संशय आहे.
शर्वरी धारगळकर: पाणी पुरवठा समितीच्या सभेत कर्मचाऱ्यांना बोलावून विचारणा केली असता, कोणी पैसे घेतले याबद्दल त्यांनी माहिती दिली होती. समिती सभेत घोळ उघडकीस येऊनही नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी कोणतीही गंभीर दखल किंवा कारवाई केली नाही.
खेमराज कुडतरकर व देव्या सूर्याजी: आजच्या मासिक बैठकीत पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी बिलांमधील तफावत स्वतः मान्य केली आहे. सभापतींनीच घोळ स्वीकारल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
ॲड. सायली दुभाषी: बिलांमधील तफावत अत्यंत मोठी असून, यात थेट आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने टाळाटाळ न करता तत्काळ पोलीस तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला पाहिजे.
सावंतवाडी नगरपरिषद पाणी पुरवठा योजना बिलावरून तफावत कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेत दिला.