सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शेअर करा

महसूल विभागातील ताणतणावाचा मुद्दा पुन्हा एरणीवर

​सावंतवाडी,दि.११ ऑगस्ट


सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. त्यांच्या या अकस्मात जाण्याने सावंतवाडी तालुक्यासह महसूल वर्तुळात आणि सामान्य जनतेमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी मुसळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांवर असणाऱ्या वाढत्या मानसिक ताणतणावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
​नायब तहसीलदार मनोज मुसळे हे अत्यंत संयमी, शांत स्वभावाचे आणि सर्वसामान्यांचे म्हणणे आपुलकीने ऐकून घेऊन प्रश्न सोडवणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. महसूल खात्यासारख्या आव्हानात्मक विभागात काम करताना त्यांनी आपल्या कार्यपद्धतीने नागरिकांचे मन जिंकले होते. मात्र, अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
​या घटनेवर शोक व्यक्त करताना डॉ. जयेंद्र परुळेकर म्हणाले, “मनोज मुसळे यांच्यासारख्या चांगल्या आणि लोकाभिमुख अधिकाऱ्याची अशी अचानक झालेली एक्झिट अत्यंत दुःखद आहे. महसूल खात्यात कार्यरत असताना अधिकाऱ्यांना प्रचंड मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.”
​महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित करताना डॉ. परुळेकर पुढे म्हणाले, “काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन प्रांत अधिकारी समीर घारे यांना अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) झटका आला होता. त्यानंतर आता मनोज मुसळे यांचे अकाली निधन झाले. या एकापाठोपाठ घडलेल्या दुर्दैवी घटना महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर असलेल्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताणतणावाकडे गांभीर्याने लक्ष वेधत आहेत.”
​मुसळे यांच्या निधनाने सावंतवाडी उपविभागाने एक कार्यक्षम आणि अभ्यासू अधिकारी गमावला असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

शेअर करा