सावंतवाडी,दि.१० सप्टेंबर
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे जानेवारी महिन्यापासून ‘सुप्रसिद्ध साहित्यिक कै.कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम’ राबविला जात आहे. सहभागी वाचक दरमहा एक पुस्तक वाचून त्यावर परीक्षण लिहीत आहेत. जुलै महिन्यातील अनुवादित पुस्तक या साहित्य प्रकाराच्या पुस्तक परिक्षणात शिरोडा येथील नीलम संजय कांबळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर उभादांडा-वेंगुर्ला येथील विशाखा वेंगुर्लेकर यांना द्वितीय आणि आसोली येथील वैभवी रायशिरोडकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. नीलम कांबळे यांनी डॉ. गेल ओमव्हेत यांचे ‘बेगमपुराच्या शोधात’ या पुस्तकाचे परीक्षण केले होते.
या उपक्रमांतर्गत प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी रस्किन बॉन्ड यांचे ‘चेरीचे झाड’, सरोज रेडकर यांनी आल्बेर काम्यू यांचे ‘परका’, अरुण धर्णे यांनी विभुतीभूषण बॅनर्जी यांचे ‘पथेर पांचाली’, स्नेहा नारींगणेकर यांनी प्रिया कुमार यांचे ‘प्रेरणादायी प्रवास एका हिरोचा’, राजेश वैज यांनी दिनकर जोषी यांची ‘प्रकाशाची सावली’, वैभवी रायशिरोडकर यांनी डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे ‘अदम्य जिद्द’, अर्चना लोखंडे यांनी सुधा मूर्ती यांचे ‘अस्तित्व’, विशाखा वेंगुर्लेकर यांनी डाॅ.एस.एल.भैरपा यांचे ‘गृहभंग’, विनय सौदागर यांनी पीटर वोह्ललेबेन यांचे ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज्’ आणि माधुरी आठल्ये यांनी डॉ. रॉबिन कुक यांचे कोमा (कादंबरी ) या पुस्तकांचे परिक्षण केले.
कुडाळ येथील चोखंदळ वाचक प्रसाद रेगे यांनी पुरस्कृत केलेल्या या उपक्रमासाठी मुंबई येथील अपूर्वा अथर्व रांगणेकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले; तर या उपक्रमाच्या संयोजनाचे काम विनय सौदागर यांनी पाहिले.