सावंतवाडी दि.१० ऑगस्ट
नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील दोन उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी हे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांनी २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन नेमळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी केले आहे.
पहिला पुरस्कार गुरूवर्य कै. ज. भा. पेंढारकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती नलिनी ज. पेंढारकर यांनी पुरस्कृत केला असून, या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनी प्रस्ताव पाठवावयाचे आहेत. दुसरा पुरस्कार सहकार महर्षी कै. शिवराम भाऊ जाधव यांच्या पत्नी कै. सौ. प्रमिला शिवराम जाधव यांच्या स्मरणार्थ सहकार महर्षींच्या मित्र परिवाराने पुरस्कृत केला असून, यासाठी जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षिकांनी आपले प्रस्ताव पाठवायचे आहेत.
पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र असे आहे. शिक्षकांनी आपल्या माहितीचे प्रस्ताव २५ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपल्या दोन छायाचित्रांसह ‘प्राचार्य आर. के. राठोड, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग’ यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.