सावंतवाडी:नव्या सावंतवाडी रेल्वेसेवेच्या पहिल्याच फेरीत अस्वच्छतेचा धक्का

शेअर करा

उद्घाटनासाठी नवी कोरी गाडी; नियमित सेवेला मात्र जुनी अस्वच्छ गाडी — प्रवाशांचा संताप

सावंतवाडी,दि.१० सप्टेंबर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई–सावंतवाडी दरम्यान सुरू करण्यात आलेल्या १५०८७ क्रमांकाच्या नियमित रेल्वेसेवेचे कोकणवासीयांनी उत्साहात स्वागत केले. मात्र, उद्घाटनाच्या फेरीसाठी नवी कोरी गाडी सोडण्यात आली असताना नियमित सेवेसाठी जुनी व अस्वच्छ गाडी देण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
उद्घाटनाच्या वेळी नव्या कोऱ्या गाडीचे दर्शन घडवून कोकणवासीयांना आकर्षित करण्यात आले. मात्र, नियमित सेवा सुरू होताच प्रवाशांच्या पदरी अस्वच्छ गाडी पडल्याने रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
१२५३३ क्रमांकाची पुष्पक एक्सप्रेस उत्तर प्रदेशातून मुंबईत दाखल झाल्यानंतर तिची पुढील सेवा १५०८७ क्रमांकाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी अशी केली जात असल्याचे सांगण्यात येते. या गाडीतील अस्वच्छतेचे व्हिडिओ प्रवाशांनी सोशल मीडियावर प्रसारित केले असून, विशेषतः बाथरूमच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“उद्घाटनाची फेरी नवी कोरी गाडी दाखवून केली; मात्र नियमित सेवेसाठी जुनी आणि अस्वच्छ गाडी सोडून कोकणी जनतेची रेल्वे प्रशासनाकडून चेष्टाच केली जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. अशा परिस्थितीत नव्याने सुरू झालेल्या नियमित रेल्वेसेवेत स्वच्छता, पाणी आणि मूलभूत सुविधांचा दर्जा चांगला असणे अपेक्षित आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन गाडीची स्वच्छता व्यवस्था सुधारावी, अशी मागणी होत आहे.

शेअर करा