शरीरसाधकांनी दाखवले पीळदार बाहूंचे सामर्थ्य; विशाल परब यांच्या दमदार वक्तृत्वाने सोहळ्यात रंगत.
सावंतवाडी,दि.०३ नोव्हेंबर
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने आणि भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात ‘भाजपा श्री २०२६’ भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. एका बाजूला शरीरसाधकांनी आपल्या पीळदार बाहूंचे सामर्थ्य दाखवत उपस्थितांची मने जिंकली, तर दुसऱ्या बाजूला युवा नेते विशाल परब यांनी आपल्या तुफानी व आकर्षक वक्तृत्वाने या संपूर्ण क्रीडा सोहळ्यात रंगत आणली.
सामान्यतः व्यासपीठावर मोजक्या शब्दांत मनोगत व्यक्त करणारे विशाल परब यांनी यावेळी आपल्या खास शैलीत संवाद साधला. त्यांच्या वक्तृत्वातील आत्मविश्वास, अचूक टायमिंग आणि राजकीय परिपक्वतेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वरिष्ठांचा आदर, सहकाऱ्यांचा सन्मान आणि भविष्यातील विकासाचे नियोजन या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला.
आपल्या भाषणामध्ये चित्रपटसृष्टीचे संदर्भ देत विशाल परब यांनी उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडवून दिला. तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा उल्लेख करताना, “ते ‘नायक’ चित्रपटातील मुख्यमंत्र्यांप्रमाणे सावंतवाडी शहराचा चेहरामोहरा बदलून विकासाला न्याय देतील,” असा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडल्याचे परब यांनी सांगितले. सिंधुदुर्गातील युवकांच्या कला आणि क्रीडागुणांना वाव देण्यासाठी भविष्यात अशाच प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन सावंतवाडीसह दोडामार्ग तालुक्यातही करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
या दिमाखदार सोहळ्याला मार्गदर्शक विनोद राऊळ, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नगरसेवक, नगरसेविका, तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी आणि निलेश गुरव यांनी केले, तर आभारप्रदर्शन नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी मानले. शरीरसौष्ठवाचा थरार आणि विशाल परब यांच्या दिलखुलास वक्तृत्वामुळे हा सोहळा सावंतवाडीत क्रीडा व राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.