३१ डिसेंबर २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या परवानाधारकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन; १ ते ३१ डिसेंबरदरम्यान सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार
सिंधुदुर्ग,दि.०२ नोव्हेंबर
जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे, त्यांनी शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करून घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील उपचिटणीस शाखेत सादर करावेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. नूतनीकरणासाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी १ अशी असून, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळून अर्ज स्वीकारले जातील. एकाच दिवशी गर्दी होऊ नये, यासाठी तालुकानिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सावंतवाडी तालुक्यातील परवानाधारकांनी दि. १, २ व ३ डिसेंबर, दोडामार्ग तालुक्यातील परवानाधारकांनी दि. ४ व ७ डिसेंबर, वेंगुर्ला तालुक्यातील परवानाधारकांनी दि. ८, ९ व १० डिसेंबर, कुडाळ तालुक्यातील परवानाधारकांनी दि. ११, १४ व १५ डिसेंबर, मालवण तालुक्यातील परवानाधारकांनी दि. १६, १७ व १८ डिसेंबर, कणकवली तालुक्यातील परवानाधारकांनी दि. २१, २२ व २३ डिसेंबर, देवगड तालुक्यातील परवानाधारकांनी दि. २४, २८ व २९ डिसेंबर, तर वैभववाडी तालुक्यातील परवानाधारकांनी दि. ३० व ३१ डिसेंबर २०२६ रोजी उपस्थित राहावे.
शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी परिपूर्ण माहितीसह Form A-3 सादर करणे आवश्यक असून, अर्जावर छायाचित्र लावावे. तसेच शस्त्र वापरण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबत तालुका ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्याकडील S-3 नमुन्यांतील प्रमाणपत्र, संबंधित पोलीस निरीक्षकांची स्वाक्षरी व शिक्क्यासह Form S-4, शस्त्र पडताळणी केल्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचे प्रमाणपत्र आणि सरपंच, पोलीस पाटील किंवा नगराध्यक्ष यांच्याकडील रहिवासी व वर्तणुकीचा दाखला अथवा आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे. यासोबत मूळ शस्त्र परवाना अर्जास जोडावा. पाच वर्षांच्या नूतनीकरणासाठी २ हजार ५०० रुपये शुल्क शासनाकडे जमा करणे आवश्यक असून, नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिवर्षी ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. विलंबाने अर्ज सादर करणाऱ्यांनी विलंबाचे सबळ कारण दर्शविणारा पुरावा अर्जासोबत जोडावा. Form A-3 अर्ज तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नूतनीकरणासाठीचे अर्ज पोस्टाद्वारे अथवा तालुक्याच्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच नूतनीकरण केलेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविण्यात येणार नाहीत. त्यामुळे संबंधित परवानाधारकांनी नेमून दिलेल्या तालुकानिहाय तारखांनाच मूळ शस्त्र परवाना व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील उपचिटणीस शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून नूतनीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी.