राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महसूल संघटनेच्या मागणीला यश; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा सुधारित आदेश जारी
सिंधुदुर्ग,दि.०२ नोव्हेंबर
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोमवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी २ नोव्हेंबर रोजी सुधारित आदेश निर्गमित केला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि महसूल संघटनेने केलेल्या मागणीला यश आले असून, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सन २०२६ या वर्षासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीमध्ये ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) रोजी धनत्रयोदशीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी शुक्रवारऐवजी सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी देण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, मुंबईच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केली होती.
संघटनेचे अध्यक्ष सत्यवान माळवे आणि राज्य सहसचिव सखाराम सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून ही मागणी केली होती. दिवाळीच्या काळात शुक्रवारनंतर शनिवार व रविवार अशा साप्ताहिक सुट्ट्या येत असल्याने सोमवारची स्थानिक सुट्टी जाहीर केल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसमवेत दिवाळी सण साजरा करण्यासाठी तसेच गावी जाण्याचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते.
या मागणीची सकारात्मक दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यापूर्वीच्या स्थानिक सुट्ट्यांच्या आदेशात सुधारणा केली. त्यानुसार ६ नोव्हेंबर रोजीची धनत्रयोदशीची स्थानिक सुट्टी रद्द करून त्याऐवजी सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी लागू करण्यात आली आहे.
या निर्णयासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना, कौटुंबिक आनंद आणि दिवाळी सणाचे महत्त्व लक्षात घेऊन घेतलेल्या या संवेदनशील व कर्मचारी हिताच्या निर्णयाबद्दल राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळी सण कुटुंबीयांसमवेत आनंदात साजरा करण्यासाठी अधिक वेळ मिळणार असून, कर्मचारी संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले आहे