Devgad News : देवगडमध्ये उद्या ‘जेल भरो’ आंदोलन होणारच; आंदोलक भूमिकेवर ठाम!

शेअर करा

मिठमुंबरी-बागवाडी प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलनाचा निर्धार!

देवगड,दि.०२ नोव्हेंबर

मिठमुंबरी-बागवाडी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत तसेच ग्रामस्थांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवगड पोलीस ठाण्यासमोर छेडण्यात येणारे ‘जेल भरो’ आंदोलन आता होणारच असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आंदोलन मागे घेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून प्रयत्न करण्यात आले. मात्र, हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. काही राजकीय सत्ताधारी मंडळींनीही आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु त्यालाही यश आलेले नाही.
आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत उद्याचे आंदोलन छेडण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत. मिठमुंबरी-बागवाडी येथील घटनेनंतर ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन दोन दिवसांची मुदतही देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित निर्णय न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
आता पोलीस प्रशासनाचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने उद्या देवगड पोलीस ठाण्यासमोर होणाऱ्या या आंदोलनात नेमका किती सहभाग असणार, आंदोलनाला कोणते वळण मिळणार आणि पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण देवगड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. देवगडमधील या ‘जेल भरो’ आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शेअर करा