Malvan News : विरोधकांचे आरोप तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे

शेअर करा

मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांची टीका

मालवण,दि.०२ नोव्हेंबर

मालवण शहरातील नव्या नळपाणी योजनेसह विविध विकासकामांबाबत विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप तथ्यहीन असून, राजकीय हेतूने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मालवण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती दीपक पाटकर यांनी केला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना महायुतीचे लोकप्रतिनिधी कटिबद्ध असून, विकासकामांमध्ये राजकीय हेतूने अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही दीपक पाटकर यांनी दिला.

मालवण शहरातील नळपाणी योजना नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाचा प्रकल्प आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेशा दाबाने आणि मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. या योजनेचे काम प्रशासकीय वरिष्ठ स्तरावरील मान्यता आणि नियमानुसार सुरू असून, कामाचा दर्जा तसेच वापरण्यात येणाऱ्या पाइपच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले. पाण्याच्या टाक्यांचे बांधकामही आवश्यक मंजुरीनंतरच करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सांगितले.

नळपाणी योजनेच्या कामावर केवळ आक्षेप नोंदवून काम रखडविण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. विकासकामांबाबत संभ्रम निर्माण करून नागरिकांमध्ये गैरसमज पसरविण्याऐवजी विरोधकांनी विधायक सूचना कराव्यात. मात्र, कोणतीही ठोस माहिती न घेता आरोप करणे म्हणजे शहराच्या विकासाला अडथळा निर्माण करणे असल्याचे पाटकर म्हणाले.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मालवण शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित विकासकामांना गती देण्यावर भर दिला जात आहे. शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास हे नगराध्यक्षा तसेच सर्व नगरसेवकांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला वस्तुस्थितीच्या आधारे उत्तर दिले जाईल. राजकीय आरोपांपेक्षा मालवण शहराचा विकास आणि नागरिकांचे हित महत्त्वाचे आहे. विकासकामांचा दर्जा राखणे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करणे यासाठी शिवसेना महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी एकजुटीने कार्यरत आहेत. विरोधकांच्या आरोपांमुळे विकासाची गती थांबणार नाही, असेही उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्पष्ट केले.

शेअर करा