Malvan News:मालवण बाजारपेठेतील हनुमान मंदिराचा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात संपन्न

शेअर करा

गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता; ‘महिमा माय माऊलीचा’ चलचित्र देखावा ठरला आकर्षण…

मालवण,दि.०२ नोव्हेंबर

मालवण बाजारपेठेतील हनुमान मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गणेश विसर्जन मिरवणुकीने या गणेशोत्सवाची सांगता झाली. गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान सादर झालेला ‘महिमा माय माऊलीचा’ हा चलचित्र देखावा लक्षवेधी ठरला.

मालवण बाजारपेठेतील हनुमान मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात झाला. यानिमित्त हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मंदिरात सुश्राव्य भजने, जंगी डबलबारी सामना, पारंपारिक दशावतारी नाट्यप्रयोग, वारकरी भजन, सत्यनारायण महापूजा, चित्रपट प्रदर्शन, अथर्वशीर्ष पठण आणि महाप्रसाद असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. शुक्रवारी भक्तिमय वातावरणात, ढोल ताशांच्या गजरात तसेच आकर्षक रोषणाई, देखणी सजावट केलेल्या पालखीतून श्री गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे सदस्य, व्यापारी बांधव व गणेशभक्त नागरिक सहभागी झाले होते.

हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत ‘महिमा माय माऊलीचा” हा आकर्षक चलचित्र देखावा सादर करण्यात आला. यात कुडाळ तालुक्यातील पावशी येथील सातेरी देवीचा इतिहास आणि महिमा प्रभावीपणे मांडण्यात आला. देवीच्या इतिहासाची महती चलचित्रातून भाविकांना अनुभवता आली. धार्मिक श्रद्धा आणि ऐतिहासिक परंपरेचा सुंदर संगम या देखाव्यातून पाहायला मिळाला. यात चेतन हडकर, दीपिका शेलटकर, मीनू देऊलकर यांनी भूमिका साकारल्या होत्या. हा देखावा सर्वांचे आकर्षण ठरला.

शेअर करा