Sindhudurg News:सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘BRICS शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६’

शेअर करा

‘एक आठवडा, सात कृती, एक पृथ्वी’ संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम

सिंधुदुर्ग,दि.०२ नोव्हेंबर

पर्यावरणाचे संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरणाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘BRICS शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६’ साजरा करण्यात येत आहे. ‘One Week, Seven Actions, One Planet’ अर्थात ‘एक आठवडा, सात कृती, एक पृथ्वी’ ही या अभियानाची संकल्पना असून, मिशन LiFE (Lifestyle for Environment) अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट, युवक मंडळे आणि नागरिकांच्या सहभागातून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे.
या सप्ताहांतर्गत आरोग्यदायी जीवनशैली, ऊर्जा बचत, पाणी बचत, शाश्वत अन्नप्रणाली, एकल वापर प्लास्टिकला नकार, ई-कचरा कमी करणे आणि कचरा व्यवस्थापन अशा सात विषयांवर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, दि. १ नोव्हेंबर रोजी आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी मिशन LiFE शपथ, योग, व्यायाम, प्रभात फेरी आणि वृक्षारोपण असे उपक्रम राबविण्यात आले. दि.२ नोव्हेंबर रोजी ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करून अनावश्यक वीज वापर टाळण्याचा संदेश दिला देण्यात आला. दि. ३ नोव्हेंबर रोजी पाणी बचत, जलसंवर्धन आणि पारंपरिक जलस्रोतांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
दि. ४ नोव्हेंबर रोजी शाश्वत अन्नप्रणाली या विषयांतर्गत तृणधान्यांचा वापर, अन्नाची नासाडी टाळणे आणि ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती यावर भर देण्यात येणार आहे. दि. ५ नोव्हेंबर रोजी एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळणे, कापडी पिशव्यांचा वापर आणि प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. दि. ६ नोव्हेंबर रोजी ई-कचऱ्याचे संकलन व त्याची योग्य विल्हेवाट याबाबत जनजागृती केली जाणार आहे. तर दि. ७ नोव्हेंबर रोजी परिसर स्वच्छता, कचऱ्याचे स्रोतावरच वर्गीकरण आणि Reduce-Reuse-Recycle या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याबाबत विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे. विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि युवक मंडळांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पाणी वाचविणे, विजेचा काटकसरीने वापर करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे अशा दैनंदिन जीवनातील छोट्या कृतींमधून पर्यावरण रक्षणासाठी मोठे योगदान देता येते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या सप्ताहात सहभागी होऊन शाश्वत व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे.

शेअर करा