संगीत वीज म्हणाली धरतीला’ नाटकाला ५ वैयक्तिक पुरस्कार
सावंतवाडी,दि.०३ नोव्हेंबर
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा, तसेच २२ वी बालनाट्य स्पर्धा, ७ वी दिव्यांग बालनाट्य स्पर्धा आणि प्रथम महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा ‘नाट्यगौरव’ राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा २०२५-२६ अत्यंत दिमाखात संपन्न झाला. या संपूर्ण सोहळ्यात सावंतवाडीच्या ‘क्षितिज इव्हेंट’ संस्थेने सादर केलेल्या ‘संगीत वीज म्हणाली धरतीला’ या नाटकाने आपल्या उत्कृष्ट कलागुणांच्या जोरावर राज्यस्तरीय अंतिम फेरीत तब्बल पाच वैयक्तिक पारितोषिकांवर आपले नाव कोरत सावंतवाडीचा सांस्कृतिक ध्वज फडकत ठेवला.
महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या या मानाच्या स्पर्धेत क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी निर्मित ‘संगीत वीज म्हणाली धरतीला’ या नाटकातील कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी आपल्या कसदार अभिनयाने व नेपथ्य-रंगभूषादी कौशल्याने परीक्षकांची आणि रसिकांची मने जिंकली.
या नाटकासाठी आज्ञा कोयंडे यांना अभिनयाचे रौप्य पदक बहाल करण्यात आले. तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट समन्वयासाठी बाळ पुराणिक (दत्तात्रय पुराणिक) यांना नेपथ्यासाठी द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले, तर वैभवी पुराणिक यांनी वेशभूषा विभागात द्वितीय पारितोषिक पटकावले. नाटकातील दृष्यपरिणाम प्रभावी ठरवणाऱ्या प्रकाश योजनेसाठी अभिषेक कोयंडे यांना तृतीय पारितोषिक मिळाले, तर कलाकारांच्या रूपाला जिवंतपणा देणाऱ्या उत्कृष्ट रंगभूषेसाठी संजय जोशी यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा जानेवारी २०२६ मध्ये संपन्न झाली होती.
मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे सोमवार, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात राज्याचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते विजेत्या कलाकार व तंत्रज्ञांना गौरविण्यात आले. पुढील वर्षी पासून संगीत एकांकिका स्पर्धा घेण्यात येणार आहेत, असे यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले
या सोहळ्यास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्यासह नाट्य जगतातील अनेक दिग्गज, नामवंत कलाकार व रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मिळालेल्या या सन्मानामुळे क्षितिज इव्हेंटच्या सर्व कलाकार व तंत्रज्ञांचे राज्यभरातून व कोकणातून कौतुक होत असून, सावंतवाडीच्या नाट्य चळवळीत या यशामुळे एक नवा उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले आहे.