वायरमन दत्ताराम पांढरे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला; दुकानातील साहित्य जळून खाक, परिसरातील घरांमधील विद्युत उपकरणांचेही नुकसान.
सावंतवाडी,दि.०३ नोव्हेंबर
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव-मळेवाड मुख्य रस्त्यावरील आजगाव तांबळवाडी येथील कामाक्षी ट्रेडर्स या दुकानातील एक खोलीतील सामनाला आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मात्र, आजगाव येथील वायरमन दत्ताराम (भाऊ) पांढरे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या शॉर्टसर्किटचा फटका कामाक्षी ट्रेडर्ससह आजूबाजूच्या घरांनाही बसला. परिसरातील काही घरांमधील पंखे, झुंबरे तसेच इतर विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. कामाक्षी ट्रेडर्समधील कुशन, कॉट, बंक बेड, गाद्या, खुर्च्या, टेबल, प्लास्टिक व नेटसह विविध वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
आगीची घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. वायरमन भाऊ पांढरे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि नागरिकांच्या प्रयत्नांमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले.