प्रेरणाभूमी सावंतवाडी येथे स्मृती परिषदेचे आयोजन; बौद्ध ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक वारशावर ज्येष्ठ अभ्यासकांचे मार्गदर्शन!
सावंतवाडी,दि.२६ऑक्टोंबर
आमच्या पूर्वजांनी बौद्ध सांस्कृतिक शिल्पकला घडविली, स्मारक घडविली, स्तूप घडविले ज्यामुळे आज आम्हाला कळते आहे की,अडीच हजार वर्षांपूर्वी या देशांमध्ये काहीतरी घडून गेलं होतं. ब्रिटिशांनी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून बौद्ध सांस्कृतिक वारसा जगासमोर प्रथम आणला. ज्यांनी बौद्ध स्थळांचं विकृतीकरण केलं त्यांच्याकरिता कडक कायदे केले. बुद्ध काल्पनिक नसून ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते हे 1838 साली आम्हाला प्रथम कळले. ब्रिटिशांनी पुरातन स्थळांचं खोदकाम केलं आणि पाली आणि सिंहली भाषेच्या माध्यमातून त्यांनी हा सांधा जोडण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ अभ्यासक धम्मसंगिनी रमा गोरख यांनी मंगळवारी प्रेरणाभूमी सावंतवाडी येथील स्मृती परिषदेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणाभूमीचे अध्यक्ष डि के पडेलकर हे होते तर सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मालवण शाखेचे अध्यक्ष- समाजभूषण संदीप कदम, कुडाळ तालुका बौद्ध विकास संघाचे सचिव- संजय कदम, युगनायक संस्थेचे मिलिंद माटे, कणकवली तालुका बौद्ध विकास संघाचे सचिव- संजय कदम, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे अभय पावसकर,गोवा येथील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत जाधव, निवृत्त बौद्ध अधिकारी संघाचे अध्यक्ष सूर्यकांत कदम एलआयसी चे माजी अधिकारी रवी किशोर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
परिषदेच्या सुरुवातीला विशेष अतिथी सन्माननीय मानवंत आणि समता प्रेरणाभूमीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समाज मंदिर आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला पुष्पहार अर्पण करण्यात आला तदनंतर समता प्रेरणाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रेरणाभूमीच्या सल्लागार ममता जाधव, मीनल जाधव, प्रज्ञा जाधव,मीनाक्षी जाधव, आर्या जाधव यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. यासाठी संगीत साथ संदेश जाधव, लक्ष्मण जाधव व सहकारी यांनी दिली. प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून मान्यवरांना संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सन्मानित केले . कार्याध्यक्ष अंकुश कदम यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
मान. धम्मसंगीनी यांनी आपल्या भाषणात,डॉ. बाबासाहेबांच्या नावाच्या भूमी वेगवेगळ्या ठिकाणी देशभरात तयार झालेल्या आहेत आणि तेथे आज जत्रा भरत आहेत. स्मारक झाली पाहिजेत परंतु ज्याचं स्मारक आपण बांधतो आहोत त्या महापुरुषाचा विचार काय होता, त्यानी कोणता रस्ता दाखवला, त्याचे व्हिजन काय होते हे जर आपण व आपल्या पुढच्या पिढ्या विसरणार असतील तर स्मारक न बांधलेली बरी. आपण ज्यांना आदर्श मानतो, आपण ज्यांच्या रस्त्याने चालतो त्या महामानवांच्या क्रांतिकारी स्मृती आपल्याला सतत आठवण करून दिल्या पाहिजेत, त्यांचा महान आदर्श, त्यांच्या आठवणी त्या स्मारकांकडे बघून आपल्याला झाल्या पाहिजेत. स्मारक बनवताना महामानवाचा विचार त्याच्या पायात गाडला जाऊ नये याची काळजी ज्यांना स्मारकाची चिंता आहे अशा सगळ्या सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे. महामानवांचे व्हिजन हे आर्थिक आघाडी व सांस्कृतिक आघाडी मध्ये रूपांतरीत झालं पाहिजे. सांस्कृतिक धोरण हे योजनांमध्ये दिसलं पाहिजे. आपल्या विचारांची सत्ता येणं व आपल्या विचारांची सांस्कृतिकता घडणे ह्या दोन बाबींमध्ये आमच्या विचारांची सत्ता आहे की नाही हे आपण ठरवू शकतो. बाबासाहेबांची धम्मक्रांती आपल्याला आर्थिक व राजकीय क्रांती करायला दिलेली होती. क्रांती करायला समज लागते, कमिटमेंट लागते आणि वेळ द्यावा लागतो. महामानवांची स्मारक आमची आर्थिक सांस्कृतिक व राजकीय सत्ता आणण्यासाठी पूरक होणार असतील तरच स्मारक झाली पाहिजेत.
खोती आंदोलनाविषयी मांडणी करताना त्या म्हणाल्या की, संसाधनाची मालकी ही कष्ट करणाऱ्यांकडे असली पाहिजे ही खोतीविरोधातील बाबासाहेबांची भूमिका होती.कसणाऱ्यांची मालकी त्या जमिनीवर असली पाहिजे.साधनांची एकाधिकारशाही असू नये. सद्यस्थितीत खोतांची परिभाषा बदलली आहे.आजचे खोत कोण आहेत हे शोधले पाहिजेत. स्मारकाच्या निमित्ताने आपल्याला सांस्कृतिक व भौतिक राजकारण कळले पाहिजे. संस्कृती ही महान गोष्ट आहे. संस्कृती सत्तेपर्यंत घेऊन जायला मदत करते.संस्कृतीकरणाच्या नावाखाली आपण केवळ पूजाअर्चा करत बसलो व आपला मूळचा लढा विसरलो तर आपल्याला गुलाम व्हायला वेळ लागणार नाही. महापुरुषांच्या विचारांना स्मारकाच्या पायथ्याशी गाडतो का हे ध्यानात ठेवले पाहिजे.
उद्घाटन सत्रामध्ये कार्यक्रमाचे विशेष अतिथी सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ऍड. अनिल नरवडेकर यांनी आपल्या भाषणामध्ये आपण बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे या पदापर्यंत पोहोचलो असून आपल्या महामानवांशी निगडीत सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करण्याची आम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.यासाठी आपण व्यक्तिशः व नगरपरिषदेमार्फत आवश्यकते सहकार्य करणार आहोत. सावंतवाडी प्रेरणाभूमीच्या विकासासाठी आपण आवश्यक ती आर्थिक तरतूद करून ठेवल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांच्यासोबत संदीप कदम, सूर्यकांत कदम, संजय कदम, मिलिंद माटे, कुडाळचे संजय कदम, रवीकिशोर चव्हाण आदी मान्यवरांनी आपले शुभेच्छा पर विचार व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या वतीने विद्यमान उपनगराध्यक्ष यांचेकडे एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये सद्यस्थितीतील स्मारकाचे उद्यानरूप बदलून सावंतवाडीतील हे ठिकाण परिवर्तनवादी चळवळीचे एक संस्मरणीय केंद्र व्हावे यासाठी या जागेवर एक बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
परिषदेमध्ये सर्वच मान्यवरांनी प्रेरणाभूमी चळवळीने केलेल्या आजवरच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करीत संस्थेच्या भावी मार्गक्रमणाला शुभेच्छा दिल्या. दुपारी अल्पोपहार नंतर आंबोली येथील दिव्या जाधव या विद्यार्थिनीने ‘मी रमाई बोलतेय…’ हा एकपात्री प्रयोग करून उपस्थितांची वाहवा मिळविली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माजगावचे सिद्धार्थ जाधव यांनी बुद्ध- भीम गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. परिषदेमध्ये दोन ठराव बहुमताने संमत करण्यात आले.
- परिषदेसाठी माजी नगरसेवक विलास जाधव, धम्मचारी तेजबोधी, पी बी चव्हाण, ऍड नामदेव मटकर, नरसू रेडकर, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, दिलीप जाधव, बुधाजी कांबळी, मधू मातोंडकर, नरेश कारीवडेकर, अनिल जाधव, श्रद्धा कदम, दीपक जाधव, सिताराम जाधव, विजय जाधव,गौतम तांबे, महेश पेडणेकर, राजेंद्र कांबळे तसेच प्रेरणाभूमीचे वासुदेव जाधव, भावना कदम, विठ्ठल कदम, शांताराम असनकर, चंद्रशेखर जाधव, दीपक जाधव, मिलिंद नेमळेकर,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. परिषदेसाठी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. परिषदेसाठी सभामंच,सभामंडप, बैठक व्यवस्था, परिसर स्वच्छता आदि महत्त्वपूर्ण जबाबदारी सावंतवाडी नगर परिषदेने सांभाळली.सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी उपस्थितांना थंड पेयाची व्यवस्था केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कांता जाधव तर अध्यक्षता डि के पडेलकर यांनी केली