Sawantwadi News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे

शेअर करा

हळव्या व निम-गरव्या भात कापणीस गती
​

सावंतवाडी,दि.०५ नोव्हेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाळी वेळापत्रक कोलमडले असल्याने भात शेती धोक्यात आली आहे. आता उरलेसुरले भातपीक कापणीनंतर पाळीव जनावरांना चारा आणि राहिले तर भात राखण्यासाठी भात कापणी सुरू आहे. दरम्यान पाऊसाची भिती असल्याने शेतकरी भातपीक कापणी सुरू केली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा (मुंबई) यांच्याकडून प्राप्त झालेल्या मध्यम मुदतीच्या जिल्हास्तरीय हवामान अंदाजानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, मुळदे कुडाळ यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळव्या व निम-गरव्या भात पिकाच्या कापणीची कामे अग्रक्रमाने पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.
​कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, भात पिकाची कापणी जमिनीलगत ‘वैभव विळ्याने’ करावी. वैभव विळ्याच्या साहाय्याने जमिनीलगत कापणी केल्यास खोडकिडीच्या अळ्या व सुप्तावस्था भाताच्या पेंढ्यासोबत निघून जातात, ज्यामुळे पुढील वर्षीच्या भात पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. या पद्धतीमुळे वेळ आणि खर्चातही बचत होते. ज्या ठिकाणी मजुरांची टंचाई असेल, तेथे शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा (रीपर/कापणी यंत्र) वापर करून कापणीची कामे विनाविलंब हाती घ्यावीत, असे आवाहन केले आहे.
​कापणी केलेले भात पीक लोंब्यासहित एक दिवस चांगले वाळवून घेतल्यानंतरच त्याची झोडणी करावी. चांगला उतारा मिळण्यासाठी झोडणी यंत्राचा (थ्रेशर) वापर करावा. झोडणीनंतर धान्य दोन ते तीन उन्हे देऊन व्यवस्थित वाळवावे आणि सुरक्षित व कोरड्या जागी साठवणूक करावी. भाताची साठवणूक करताना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांपर्यंत ठेवल्यास साठवणुकीदरम्यान लागणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, असे म्हटले आहे.
गरव्या भात पिकाच्या कापणीबाबत माहिती देताना तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, काढणीस तयार असलेल्या गरव्या भाताच्या कापणीला उशीर झाल्यास प्रखर उन्हामुळे लोंबीच्या टोकाचे चांगले दाणे शेतात गळून पडतात. तसेच भात कांडपाच्या वेळी कणीचे (तुटलेल्या दाण्यांचे) प्रमाण वाढते आणि पेंढ्याची प्रत खालावून पेंढा कमी मिळतो.
​काढणी केलेले भात पीक केवळ एकच दिवस उन्हात वाळवून दुपारच्या वेळी त्याची झोडणी करावी. कापणी केलेले पीक दोन ते तीन दिवस उन्हात राहिल्यास, सकाळच्या वेळी पडणाऱ्या दवामुळे दाणे भिजतात आणि नंतर पुन्हा वाळल्याने दाण्यांना तडे जातात. परिणामी भात कांडपाच्या वेळी कणीचे प्रमाण वाढून शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन कापणी व झोडणीची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहन मुळदे कृषी संशोधन केंद्राच्या प्रमुखांनी केले आहे.

शेअर करा