सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर….

शेअर करा

३१ जानेवारीला परीक्षा; २ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत…

सावंतवाडी,दि.०५ नोव्हेंबर

संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सैनिक स्कूल्स सोसायटीच्या वतीने देशभरातील सैनिक स्कूल्समधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा – २०२७ चे वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावी आणि नववीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. सहावीच्या प्रवेशासाठी सध्या पाचवीत शिकणारे, तर नववीच्या प्रवेशासाठी सध्या आठवीत शिकणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ नोव्हेंबर पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. ही प्रवेश परीक्षा ३१ जानेवारी २०२७ रोजी देशभरात घेतली जाणार आहे. परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्नांचे असून पेन-पेपर पद्धतीने ओएमआर उत्तरपत्रिकेवर परीक्षा होईल. सहावीसाठी परीक्षेचा कालावधी १५० मिनिटे असून ही परीक्षा १३ भाषांमध्ये उपलब्ध असेल. तर नववीसाठी परीक्षेचा कालावधी १८० मिनिटे असून ती इंग्रजी माध्यमातून घेतली जाणार आहे. परीक्षेच्या शहराची माहिती ११ जानेवारी रोजी जाहीर होणार असून प्रवेशपत्र २५ जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे.

सैनिक शाळांमधील शिक्षणातून विद्यार्थ्यांना शिस्त, नेतृत्वगुण, शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव विकसित करण्याची संधी मिळते. संरक्षण दलांमध्ये अधिकारी म्हणून करिअर करण्याची आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक शाळांचे शैक्षणिक वातावरण विशेष उपयुक्त ठरते. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज, माहितीपत्रक आणि अन्य तपशील राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये या परीक्षेसंबंधी विशेष मार्गदर्शन कक्ष उपलब्ध असून पालक आपल्या पाल्याची पात्रता, प्रवेशाचे निकष आणि अभ्यासक्रम यासंबंधी माहिती इथे घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी 9167077940 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा