सावंतवाडी : मासिक बैठकीत अधिकाऱ्याचा मोबाईलवर मटक्याचा आकडा तपासण्यात वेळ

शेअर करा

लोकप्रतिनिधी गंभीर प्रश्नांवर चर्चा करत असताना बेजबाबदार प्रकार उघड; सभापती व उपसभापतींकडून तीव्र नाराजी व्यक्त

सावंतवाडी,दि.२१ मे
पंचायत समितीच्या मासिक बैठकीत लोकप्रतिनिधी तालुक्याच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करत असताना, दुसरीकडे एका जबाबदार अधिकाऱ्याने चक्क मोबाईलवर मटक्याचा आकडा तपासण्यात मग्न असल्याचा धक्कादायक प्रकार आज सावंतवाडीत उघडकीस आला. बैठकीला उपस्थित असलेल्या पत्रकारांनीच हा संपूर्ण बेजबाबदार प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, यामुळे पंचायत समितीच्या कारभारावर आणि अधिकाऱ्यांच्या गांभीर्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संतापजनक घटनेबाबत पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
​सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक आज आयोजित करण्यात आली होती. तालुक्याचे केंद्रस्थान असलेल्या या समितीच्या बैठकीला सर्वच विभागांचे प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. वेगवेगळ्या गटांतील सदस्यांकडून जनतेचे आणि विकासाचे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले जात होते. या गंभीर विषयांवर महत्त्वाची चर्चा सुरू असतानाच, जिल्हा परिषदेच्या सावंतवाडी येथील बांधकाम विभागातील एक वरिष्ठ लिपिक सभागृहातील चर्चेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्या मोबाईलवर मटक्याचा आकडा तपासत बसला होता. केवळ बैठकीला हजेरी लावायची म्हणून हा अधिकारी तिथे उपस्थित होता की काय, अशी स्थिती या प्रकारामुळे निर्माण झाली होती.
​राज्याच्या विधानसभेत तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यावेळी विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरल्याने कोकाटे त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले होते. आज सावंतवाडी पंचायत समितीत घडलेला प्रकारही त्याच स्वरूपाचा असल्याने उपस्थित नागरिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या कर्मचाऱ्यावर नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
​दुसरीकडे, सभागृहामध्ये झालेला हा प्रकार उपसभापती गौरव मुळीक यांच्या कानावर पडताच त्यांनी अधिकारी वर्गाला सक्त सूचना दिल्या. अधिकारी वर्गाने बैठकी दरम्यान अत्यंत आवश्यक असल्यास आणि शासकीय कामासाठीच मोबाईलचा वापर करावा, अन्यथा मोबाईल वापरू नये असे सांगत, बैठक संपल्यानंतर अशा प्रकारची बेजबाबदार वृत्ती ठेचून काढली पाहिजे असे स्पष्ट केले. तर सभापती सुश्मिता जाधव यांनी, सभागृहात घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर असून आम्ही या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेत आहोत, तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.

शेअर करा