सावंतवाडी,दि.९ ऑगस्ट
दोडामार्ग आणि सावंतवाडी पंचायत समितीच्या वतीने अनुक्रमे १३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मध्यंतरी प्रशासकीय राजवट सुरू असल्याने या सभांचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र, आता पंचायत समितीवर पुन्हा लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू झाल्याने या आमसभांचा मार्ग मोकळा झाला आहे.
पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार केसरकर म्हणाले की, सावंतवाडी आणि दोडामार्ग पंचायत समितीने आमसभा आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार त्यांना या तारखा देण्यात आल्या आहेत. या दोन्ही तालुक्यांनंतर लवकरच वेंगुर्ले पंचायत समितीची देखील आमसभा आयोजित केली जाईल.
आमदारांनीच आमसभा आयोजित केली पाहिजे, असा एक गैरसमज काही जणांमध्ये आहे. तो दूर करताना केसरकर यांनी स्पष्ट केले की, आमसभा पंचायत समिती आयोजित करते. या आमसभेत मंजूर होणारे विविध ठराव व विकासकामांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा करून मार्गी लावले जातात. आमसभेत सर्वांना सहभागी होता येते असे त्यांनी सांगितले.