सावंतवाडी : वर्षाला फक्त ४ गॅस सिलिंडर? मग गृहिणी म्हणून जगायचं कसं?

शेअर करा


साक्षी वंजारी यांचा परखड सवाल सावंतवाडी

सावंतवाडी,दि. १ १ जून
महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. भाजीपाला, धान्य, तेल, दूध, वीज, शालेय खर्च यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असताना वर्षाला फक्त ४ सिलिंडर मिळणार असल्याची चर्चा समोर आली, तर प्रत्येक गृहिणीच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो — “मग घर चालवायचं कसं?” असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला आहे.

साक्षी वंजारी यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे त्यात म्हटले आहे,घरातील चूल ही केवळ स्वयंपाकाची जागा नसते, तर ती संपूर्ण कुटुंबाच्या जगण्याचा आधार असते. सकाळचा चहा, मुलांचा डबा, वयोवृद्धांचे जेवण, पाहुणचार, सण-उत्सव या सर्व गोष्टी गॅसवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत वर्षाला केवळ चार सिलिंडर म्हणजे तीन महिन्यांत एक सिलिंडर वापरायचा? हा विचारच अव्यवहार्य वाटतो.

ग्रामीण भागातील अनेक महिलांना अजूनही चुलीचा धूर, सरपण गोळा करण्याची कसरत आणि आरोग्याच्या समस्या यांचा सामना करावा लागतो. सरकारने “धुरमुक्त स्वयंपाकघर” ही संकल्पना पुढे आणली, महिलांना गॅस जोडण्या दिल्या. पण आता जर गॅसच परवडेनासा झाला किंवा मर्यादित झाला, तर पुन्हा महिलांना धुराच्या चुलीकडे ढकलण्याचा हा प्रकार नाही का?

आज एका मध्यमवर्गीय कुटुंबात महिन्याला किमान एक सिलिंडर लागतो. मोठे कुटुंब असेल तर त्यापेक्षाही जास्त. अशावेळी वर्षाला फक्त चार सिलिंडर म्हणजे उर्वरित आठ महिने काय करायचे? लाकूडफाटा गोळा करायचा? रॉकेल शोधायचे? की उपाशी राहायचे?

महिलांना केवळ स्वयंपाकच करायचा नसतो. घराचा संपूर्ण अर्थकारणाचा ताळमेळ त्यांनाच सांभाळावा लागतो. रोज वाढणाऱ्या खर्चात काटकसर करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या गृहिणींना अशा निर्णयांचा सर्वाधिक फटका बसतो. कारण बजेट बिघडले की त्याचा पहिला भार घरातील स्त्रीवरच येतो.

लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते आणि प्रशासन यांनी वातानुकूलित कार्यालयांमधून निर्णय घेण्यापूर्वी एकदा सामान्य गृहिणीच्या स्वयंपाकघरात डोकावून पाहावे. महिन्याचा खर्च भागवण्यासाठी ती किती तारेवरची कसरत करते, हे समजून घ्यावे. कागदावरचे आकडे आणि प्रत्यक्ष आयुष्य यामध्ये खूप मोठी दरी असते.

महागाईच्या या ज्वालामुखीवर सामान्य माणूस आधीच होरपळत आहे. त्यात गॅससारख्या मूलभूत गरजेवर निर्बंध आले, तर तो केवळ आर्थिक प्रश्न राहणार नाही, तर महिलांच्या आरोग्याचा, सन्मानाचा आणि कुटुंबाच्या जीवनमानाचा प्रश्न बनेल.

सरकारने जनतेला दिलासा द्यावा, महागाईवर नियंत्रण आणावे आणि घरगुती गॅस हा चैनीचा नव्हे तर जीवनावश्यक घटक आहे, याची जाणीव ठेवावी. अन्यथा उद्या प्रत्येक गृहिणीचा एकच सवाल आहे – “चूल पेटवायची कशी आणि संसार चालवायचा कसा?”
सत्ताधारी महिला ह्या वर आवाज उठवणार का?? असा प्रश्न सौ साक्षी वंजारी यांनी केला आहे.

शेअर करा