- पालकमंत्री, आमदारांना जाब विचारणार ; मनसे जिल्हाध्यक्ष आक्रमक
सावंतवाडी,दि.१४ जून
उपजिल्हा रुग्णालयात सावंतवाडीत बांदा येथील आरोग्य केंद्रातून तापाचा रुग्ण पाठविण्यात आला. मात्र, कालपासून त्याच्यावर साधे उपचार झालेले नाहीत. डॉक्टरांना रुग्ण तपासायला वेळ नसेल तर हॉस्पिटलला लॉक मारा, रुग्णांच्याबाबतीत सुरू असणारा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. याबाबत पालकमंत्री, स्थानिक आमदारांना जाब विचारू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.
ॲड. केसरकर म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यासाठी आम्ही उपजिल्हा रुग्णालयात गेलो होतो. यावेळी येथील एका तापाच्या रूग्णाला२४ तास होऊन देखील तपासण्यासाठी कोणी आले नाही. त्यामुळे रूग्णाला स्वतःच बांदा येथे दिलेली गोळी घ्यावी लागली. मात्र, तरीही ताप कमी झाला नाही. याबाबत प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत यांना बोलावले असता ते आले नाहीत. उपस्थित डॉक्टरकडून रुग्णाला तपासले पाहिजे होते, औषध दिली पाहिजे होती असं सांगितलं गेले. त्यामुळे हे काम करायच कोणी ? जर डॉक्टरांना रुग्ण तपासायचे नसतील फक्त गोव्यात पाठवायचे असतील तर हॉस्पिटलला लॉक माराव असा इशारा दिला. तर आजच या ठिकाणी साप आल्याचेही निदर्शनास आले. मात्र, प्रशासनाकडून त्याची दखल घेतली गेली नाही. रूग्णांच्या बाबतीतला हा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. पालकमंत्री आणि आमादारांना मनसे याबाबत जाब विचारेला असा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला. यावेळी राजू कासकर, मिलिंद सावंत, सुधीर राऊळ आदी मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ संदिप सावंत यांना विचारले असता आज आपण रजेवर असल्याने सहकारी डॉक्टरांना याबाबत कल्पना दिली आहे. त्यांनी रुग्णाची तपासणी केली असून उपचार सुरू आहेत अशी माहिती दिली.