​​सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला व भूसंपादनास फुकेरी ग्रामस्थांचा विरोध; प्रशासनाला दिले निवेदन

शेअर करा

सावंतवाडी, दि. १ जुलै
बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग सावंतवाडी तालुक्यातील फुकेरी गावातून जाणार असल्याने, या महामार्गाच्या भूसंपादनाला आणि मोजणीला फुकेरी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आपल्या मागण्यांबाबत संबंधित प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत गावात कोणतीही मोजणी होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी प्रांताधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
​शक्तीपीठ महामार्ग शिवकालीन हनुमंत गड असलेल्या फुकेरी गावातील सर्व्हे नं. २८/१, २७/१ आणि ३२ ते ३७ मधून प्रस्तावित आहे. या महामार्गामुळे ऐतिहासिक हनुमंत गडासह गावातील शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फुकेरी गाव हे ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र) येत असल्याने, महामार्गामुळे परिसरातील नैसर्गिक जलस्रोत धोक्यात येतील आणि याचा मोठा फटका भावी पिढीला बसेल, अशी चिंता ग्रामस्थांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
​ग्रामस्थांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
​अधिकृत माहिती द्यावी: महामार्गाची गावातील रचना कशी असेल, किती जमीन संपादित केली जाणार आणि नुकसान भरपाईचे निकष काय आहेत, याची सविस्तर माहिती सक्षम अधिकाऱ्यांनी स्वतः गावात येऊन द्यावी.
​निसर्गाचे रक्षण व्हावे: शिवकालीन हनुमंत गडासह आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याला कोणताही धक्का लागू नये.
​रचना बदलावी: हा महामार्ग लोकांच्या भर वस्तीतून नेण्यात येऊ नये.
​सर्व्हिस रोडची मागणी: फुकेरी गावाला या महामार्गाचा फायदा व्हावा, यादृष्टीने सर्व्हिस रोडची व्यवस्था करावी.
​नुकसान भरपाई: महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला आधीच जाहीर करावा.
​प्रशासनाचे यापूर्वी लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. जोपर्यंत मागण्यांचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत विरोध कायम राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. हे निवेदन देतेवेळी शंभा लाडू आईर, बाबू महादेव आईर, सत्यवान सखाराम आईर, शिवाजी महादेव आईर, शिवराम विजय आईर यांच्यासह फुकेरी गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा