जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमेत उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांचे आवाहन; सिंधुदुर्ग प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कचरा कुंड्यांच्या वापरावर भर
सावंतवाडी,दि.५ जून
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी वनविभागाने निसर्गाच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येथील ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न नरेंद्र डोंगराला प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी वनविभागाच्या पुढाकाराने ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. नरेंद्र डोंगरावर आयोजित भव्य वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेदरम्यान उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी अधिकृतपणे या मोहिमेची घोषणा केली. तसेच, सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांनी कचरा कुंड्यांचा प्रभावी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुढील १५ दिवसांत टप्प्याटप्प्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने निसर्गाचा समतोल राखणारे दीड हजार वटवृक्ष (वड) आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या साडेतीन हजार ‘नरक्या’ वृक्षांचा समावेश आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली. गेल्या वर्षी वनविभागाने ‘सुरंगी’ वृक्षाच्या लागवडीला प्राधान्य दिले होते, ज्याची आता उत्तम प्रकारे जोपासना होत आहे.
सावंतवाडी वनविभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सहसचिव विनायक गावस, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पत्रकार रुपेश हिराप, नागेश पाटील, भूवन नाईक, श्रीरंग सावंत, तनया रेडकर यांच्यासह वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल मिताली कुबल, प्रमोद राणे, अनेक वनरक्षक आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात आपले विचार मांडताना पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पर्यटकांच्या आणि नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनावर चिंता व्यक्त केली. नरेंद्र डोंगरावरील खाजगी वन भागातून गोळा झालेला कचरा हा मानवी मानसिकतेचा आरसा दाखवणारा आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, “केवळ नवीन वृक्षारोपण करून थांबायचे नाही, तर पिढ्यानपिढ्या जतन केलेली आणि वाढलेली जुनी झाडे टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. या जुन्या वृक्षांना आपण आपले ‘आजी-आजोबा’ समजून त्यांची काळजी घेतलीपाहिजे आणि त्यांना जपले पाहिजे.

या स्वच्छता मोहिमेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत, उपस्थित सर्व मान्यवर, वनविभागाचे कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमींनी नरेंद्र डोंगराचा परिसर पिंजून काढला. या मोहिमेदरम्यान तब्बल ५० गोणी प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला आणि त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावून डोंगराला मोकळा श्वास मिळवून देण्यात आला. वनविभागाच्या या कौतुकास्पद मोहिमेमुळे संपूर्ण जिल्ह्यातून पर्यावरण संवर्धनाचा एक नवा संदेश गेला आहे.
नरेंद्र डोंगरावर ‘वर्षा वन पर्यटन’ संकल्पना राबवणार : मिलिश शर्मा
उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी जिल्ह्यातील वन पर्यटनाच्या समृद्ध संधींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले:
”वनविभागाच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. पारपोली, नरेंद्र डोंगर आणि आंबोली यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांसाठी ‘होम स्टे’ (Home Stay) सारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आंबोलीच्या आगामी वर्षा पर्यटनाच्या (पावसाळी पर्यटन) पार्श्वभूमीवर, नरेंद्र डोंगर येथेही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘वर्षा वन पर्यटन’ उपक्रम राबविला जाणार आहे.