राजीनाम्यावरून सावंतवाडी पालिकेत राजकारण तापले

शेअर करा

अपहाराचे सर्व आरोप खोटे, प्रतीक बांदेकर निर्दोष – नगराध्यक्षा श्रद्धा भोसले

सावंतवाडी, दि. ९ ऑक्टोबर
सावंतवाडी नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी ७ ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बांदेकर आणि भाजप पक्षाला बदनाम करण्याचे प्रयत्न होत असल्याने, तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी हा राजीनामा दिला असल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांनी दिले. नगरपरिषदेच्या मासिक बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
​नगराध्यक्षा भोसले म्हणाल्या की, प्रतीक बांदेकर हे अत्यंत निर्दोष असून पाणीपुरवठा विभागात कोणताही अपहार झालेला नाही. शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी अर्धवट माहितीच्या आधारे पालिका आणि शहराची बदनामी करत आहेत. बांदेकर यांना सहीचे कोणतेही अधिकार नसताना त्यांच्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. पाणीपुरवठा विभागातील काही बाबी निदर्शनास येताच संबंधित बिले तात्काळ रोखण्यात आली आहेत. आता या विभागाचे प्रशासक काळापूर्वीचे आणि प्रशासकीय काळातील सर्व रेकॉर्ड ‘थर्ड पार्टी ऑडिट’द्वारे तपासले जाणार आहे. चौकशीअंती बांदेकर यांना पुन्हा सभापती पद दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
​मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी: नगरपरिषदेच्या बैठकीत काही नवीन बाबी समोर आल्या असून त्यांची सखोल चौकशी केली जाईल. तसेच, सध्याच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली असून लवकरच नवीन मुख्याधिकारी मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
​ शहरात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. प्रशासकीय काळात अखर्चित राहून शासनाकडे परत गेलेला ९ कोटींचा निधी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच विस्थापित स्टॉलधारकांना लवकरच योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल. अखर्चित निधी पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव दिला आहे तसेच यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले जाईल असे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नगरपरिषद बैठकीत झालेल्या आरोपांची शहानिशा केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

​या पत्रकार परिषदेला सभापती सुधीर आडीवरेकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, नीलम नाईक, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते.

शेअर करा