सावंतवाडी,दि.१८ सप्टेंबर
कोकण रेल्वे महामंडळात महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक हिस्सा असूनही कोकणातील प्रवाशांच्या पदरी उपेक्षाच पडत आहे. कोकण रेल्वेच्या तिसऱ्या आर्थिक पुनर्रचना पॅकेजमध्ये गोवा आणि कर्नाटकातील प्रकल्पांना प्राधान्य देताना महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाकांक्षी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि दुहेरीकरणाच्या मुद्द्याला डावलण्यात आल्याचा आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे. केंद्र सरकारने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
गोवा-कर्नाटकला झुकते माप, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष:
‘पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या (NPG) १०४ व्या बैठकीत कोकण रेल्वेच्या तिसऱ्या आर्थिक पुनर्रचना पॅकेजला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यात गोव्यातील पेडणे आणि जुने गोवे येथील बोगद्यांना समांतर नवीन जुळे बोगदे बांधण्यासाठी १५०-०० कोटींहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच गोव्यातील मायें, न्यूरा-ओ-ग्रांदे आणि कर्नाटकातील मुकांबिका रोड-बायंदूर येथे नवीन क्रॉसिंग स्थानके प्रस्तावित आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सावंतवाडी टर्मिनस आणि संपूर्ण कोकण मार्गाच्या दुहेरीकरणाचा यात समावेश न केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष आहे, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी सांगितले.
भूमिपूजनाला ११ वर्षे पूर्ण, तरीही प्रकल्प रखडलेला:
२७ जून २०१५ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झाले होते. मात्र, दशक उलटून गेल्यानंतरही केवळ निधीअभावी हा दर्जावाढ प्रकल्प रखडलेला आहे. कोकण आणि मुंबई मधील लोकप्रतिनिधीचा कारभार सुशेगाद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे असे प्रवासी संघटनेचे मत आहे.
प्रशासकीय अडचणी आणि विलीनीकरणाचा खोळंबा:
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव भागभांडवलाच्या परताव्यावरून प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारने गुंतवलेले ३९६.५४ कोटी रुपयांचे भागभांडवल परत करण्याची आणि ‘कोकण रेल्वे’ हे नाव कायम ठेवण्याची अट घातली आहे. या प्रशासकीय वादामुळे रोहा ते ठोकूर (७३९ किमी) दरम्यानच्या दुहेरीकरणाचे काम रखडले असून आतापर्यंत केवळ रोहा-वीर आणि मडगाव-माजोर्डा दरम्यान ५५ किमीचेच दुहेरीकरण पूर्ण झाले आहे.
सावंतवाडी टर्मिनसचे तांत्रिक महत्त्व
मुंबई, ठाणे व पुण्याहून सुटणाऱ्या अनेक गाड्यांना टर्मिनस सुविधा नसल्याने मडगावपर्यंत चालवावे लागते. सावंतवाडीत दोन अतिरिक्त हाय-लेव्हल आयलंड प्लॅटफॉर्म, लूप लाईन्स, क्विक वॉटरिंग सिस्टीम आणि वॉशिंग पिट लाईन उभारल्यास गाड्या येथेच समाप्त करता येतील. यामुळे मडगाव यार्डावरील ताण कमी होऊन गणेशोत्सव, होळी आणि सुट्ट्यांच्या काळातील विशेष गाड्यांचे नियोजन सुलभ होईल, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी बोलताना सांगितले.
प्रवासी संघटनेच्या प्रमुख मागण्या:
तिसऱ्या आर्थिक पुनर्रचना पॅकेजमध्ये सावंतवाडी टर्मिनसचा त्वरित समावेश करावा.अतिरिक्त प्लॅटफॉर्म, लूप लाईन्स, स्टॅबलिंग ट्रॅक्स आणि वॉशिंग पिट लाईनचा सुधारित तांत्रिक आराखडा मंजूर करावा.
टर्मिनस बांधकामासाठी स्वतंत्र भांडवली निधीची तरतूद करावी.वैभववाडी ते माजोर्डा दरम्यान प्रस्तावित दुहेरीकरणासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी
संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर, सचिव मिहीर मठकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाला तांत्रिक निवेदन पाठवून केली आहे तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोट:
चाकरमानी लोकांची एकजूट हवी…
कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे टर्मिनस सावंतवाडी येथे मंजूर केले आहे. ते उभारले गेले असते तर प्रवाशांची गैरसोय दूर झाली असती पण याकडे भूमिपूजन करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष नाही. खरंतर त्यांचे लक्ष वेधण्याची कोकणासह मुंबई मधील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. आता चाकरमानी प्रवाशांची यासाठी एकजूट झाली पाहिजे. तरच रेल्वे प्रवास सुखकर होईल, असे सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी बोलताना सांगितले.