सावंतवाडी,दि.२३ सप्टेंबर
गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिल्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाले आहेत. आज तालुक्यातील काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या खऱ्या, परंतु जोरदार पावसाऐवजी केवळ शिडकावाच पाहायला मिळाला. दिवसभर ढगाळ वातावरण बनले होते, तरीही दमदार पाऊस न झाल्याने भातशेतीसह बागायती पिके गंभीर संकटात सापडली आहेत.
हवामान खात्याने मान्सून परतीच्या वाटेवर असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, परतीचा पाऊस तरी जोरदार होईल या आशेवर असलेल्या बळीराजाची निराशा झाली आहे. सध्याच्या स्थितीत भात पिकाला तसेच आंबा-काजू बागायतीला पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, पावसाच्या लहरीपणामुळे शेतातील पिके सुकू लागली आहेत.
यंदाच्या संपूर्ण मान्सून हंगामात सावंतवाडी तालुक्यात पुरेसा आणि सलग पाऊस झालाच नाही. परिणामी, दरवर्षी जमिनीत निर्माण होणारे उमाळे आणि झरे यंदा तयार झालेले नाहीत. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावण्याची चिन्हे असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाने अशीच दांडी मारल्यास हातातोंडाशी आलेला भातपिकाचा घास हिरावला जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.