​सावंतवाडी : रानमाणूस फाउंडेशनतर्फे ‘बाप्पा माझा राखणदार’ श्री गणपती सजावट स्पर्धा; ३० ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

शेअर करा

​सावंतवाडी,दि.१२ ऑगस्ट
रानमाणूस फाउंडेशन, सिंधुदुर्ग आयोजित ‘बाप्पा माझा राखणदार’ या विशेष श्री गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “जल, जंगल, जमीन आणि संस्कृती वाचवूया” असा संदेश देणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून कोकणातील निसर्ग, स्थानिक परंपरा, लोककला, शेती, जैवविविधता व सांस्कृतिक वारसा जपणार्‍या खऱ्या ‘राखणदारां’चा गौरव केला जाणार आहे.
​कोकणातील गणपती हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो निसर्ग, संस्कृती आणि जीवनपद्धतीचा उत्सव आहे. गणेशोत्सवातील आरासीतून आपल्या गावाची ओळख, पूर्वजांची परंपरा आणि पुढील पिढीसाठी जपायचा कोकण यांचा संदेश प्रभावीपणे मांडणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
​स्पर्धेचे सहा मुख्य विषय:रापणकार-दर्याचा राखणदार: कोकणाचा समुद्र, मासेमारी, रापण परंपरा आणि समुद्रावर अवलंबून असलेले जीवन.मातीच्या घरांचा राखणदार: पारंपरिक मातीची घरे, कौलारू वास्तू, स्थानिक बांधकाम पद्धती आणि ग्रामजीवन.
गावठी बियाणे, शेती आणि वाडीचा राखणदार: स्थानिक बियाणे, पारंपरिक शेती, भातशेती, फळबागा, वाड्या आणि शेतकरी जीवन. देवराईचा राखणदार: देवराई, जंगल, स्थानिक वनस्पती, जैवविविधता व निसर्गसंवर्धन.दशावतार कलेचा राखणदार: कोकणातील दशावतार, लोककला, पारंपरिक कलाकार आणि सांस्कृतिक वारसा.गाव राखणदार (जल, जंगल, जमीन वाचवणारा संघर्ष): पाणी, जमीन, जंगल, शेती व गावाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणासाठी सुरू असलेले स्थानिक प्रयत्न व संघर्ष असे स्वरूप आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याशिवाय स्थानिक जैवविविधता, संस्कृती, परंपरा व प्रभावी सामाजिक संदेशासाठी ‘विशेष राखणदार पुरस्कार’ देऊन गौरव केला जाईल.
​ही स्पर्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील पारंपरिक घरातल्या गणपती उत्सवासाठी मर्यादित राहील. स्पर्धेसाठी नावनोंदणी करणे बंधनकारक असून, नावनोंदणीची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२६ आहे.
​अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९४२३३०९१६६ किंवा ९७६२९४९७०३ या व्हॉट्सॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा