सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिरात २ ऑक्टोबरला ‘नाथपर्व’ कादंबरीचे अभिवाचन

शेअर करा

सावंतवाडी,दि.२५ सप्टेंबर


येथील ऐतिहासिक श्रीराम वाचन मंदिराच्या शतकोत्तर हीरक महोत्सवानिमित्त आयोजित ‘मुक्तसंवाद’ या कार्यक्रमांतर्गत कोकणचे सुपुत्र व थोर संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘नाथपर्व’ या कादंबरीतील निवडक भागांचे अभिवाचन आयोजित करण्यात आले आहे.
​हा कार्यक्रम शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ (गांधी जयंती) रोजी सायंकाळी ५:३० वाजता श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात पार पडणार आहे.
​‘नाथपर्व’ या कादंबरीचे लेखन सावंतवाडीचे ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दशरथ बांदेकर यांनी केले असून, तिचे प्रकाशन मनोविकास प्रकाशन, पुणे यांनी केले आहे. या कार्यक्रमात कणकवलीचे प्रसाद घाणेकर आणि सावंतवाडीच्या वंदना करंबेळकर हे कादंबरीतील निवडक प्रसंगांचे अभिवाचन करणार आहेत. अभिवाचनाचा हा कार्यक्रम साधारण एक तासाचा असेल.
​बॅ. नाथ पै यांच्या प्रेरक जीवनप्रवासाचा परिचय करून देणाऱ्या या विशेष अभिवाचन कार्यक्रमाला सर्व साहित्यप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम वाचन मंदिराच्या ‘मुक्तसंवाद’ कार्यक्रम समिती आणि आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा