खरेदीदाराच्या शेतकरी दाखल्याची कडक पडताळणी करण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश
सावंतवाडी,दि.१० ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बनावट आणि अनधिकृत शेतकरी दाखल्यांच्या आधारे शेतजमिनींची दस्त नोंदणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. अशा गैरप्रकारांना अटकाव करण्यासाठी शेतजमीन खरेदी करताना खरेदीदाराच्या शेतकरी दाखल्याची कडक व बिनचूक पडताळणी करूनच दस्त नोंदणी करण्याचे निर्देश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व दुय्यम निबंधकांना विशेष मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ मधील कलम ६३ मधील कायदेशीर तरतुदीनुसार बिगर-शेतकरी व्यक्तीस शेतजमीन खरेदी किंवा हस्तांतरित करून घेण्यास बंदी आहे. शेतजमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात खरेदीदार व्यक्ती ‘शेतकरी’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाने दिलेला वैध शेतकरी दाखला सादर करणे कायद्याने अनिवार्य आहे. परंतु, जिल्ह्यात काही प्रकरणांमध्ये बोगस दाखल्यांच्या आधारे दस्त नोंदणी होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या.
या बेकायदेशीर प्रकारांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत: दुय्यम निबंधकांसाठी प्रत्यक्ष पडताळणी बंधनकारक केली आहे.शेतजमिनीची कोणतीही खरेदी-विक्री दस्त नोंदणी करताना खरेदीदाराच्या शेतकरी दाखल्याची प्रत्यक्ष व अचूक पडताळणी करणे दुय्यम निबंधकांसाठी पूर्णपणे बंधनकारक राहील.
मूळ तहसील कार्यालयाकडून सत्यता पडताळणी आवश्यक करण्यात आली आहे.सादर केलेला शेतकरी दाखला ज्या तहसील कार्यालयातून निर्गमित झाला आहे, त्या कार्यालयाकडून त्याची वैधता व सत्यता पूर्णपणे सिद्ध झाल्याशिवाय दुय्यम निबंधकांनी संबंधित दस्त नोंदणीकृत करू नये, असे निर्देश दिले आहेत.
तसेच फेरफार नोंदीपूर्वी तलाठ्यांनी तपासणी करणे अनिवार्य केले आहे.खरेदी दस्ताची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, ७/१२ उताऱ्यावर फेरफार अंमलबजावणी करताना संबंधित तलाठ्यांनी सादर केलेल्या दाखल्याची अचूक पडताळणी करावी. दाखला निर्गमित करणाऱ्या मूळ तहसील कार्यालयाच्या अभिलेखांशी पडताळणी केल्याशिवाय तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांनी फेरफार मंजूर करू नये व अंमलबजावणी करू नये, असे आदेश दिले आहेत.
या नियमांचे उल्लंघन करून परवानगी दिलेल्या कोणत्याही प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा देत संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी या आदेशाची तत्काळ आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्या तसेच महाराष्ट्र बाहेरील व्यक्ती जमिनी खरेदी करत आहेत. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांना तसे आदेश दिले आहेत.