आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनंतर सुधारित वेळापत्रक जाहीर
सावंतवाडी,दि.१९ ऑक्टोंबर
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या दुरुस्ती, नूतनीकरण व देखभालीच्या कामांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून सुधारित जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. गोवा शासनाने तिलारी डाव्या कालव्यातून अखंडित पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथे घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार, तिलारी डाव्या कालव्याची दुरुस्ती सध्या स्थगित करण्यात आली आहे.
यापूर्वी १० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रकटनानुसार १ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवून दुरुस्ती कामे केली जाणार होती. मात्र, गोवा राज्याकडून २० ऑक्टोबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत तिलारी जोड कालव्याच्या दुरुस्तीसाठी परवानगी मिळाल्याने, या बंदच्या काळात जोड कालव्यासोबतच कालव्यावरील सर्व वितरिकांची (Minors) दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश आमदार केसरकर यांनी दिले आहेत.
२० ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान दुरुस्तीची कामे:
नवीन वेळापत्रकानुसार २० ऑक्टोबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत तिलारी जोड कालवा, उजवा तीर कालवा आणि दोन्ही कालव्यांवरील सर्व वितरिकांची दुरुस्ती केली जाणार आहे.
जानेवारी २०२७ पासून पाणीपुरवठा सुरू होणार आहे.या दुरुस्तीच्या कालावधीनंतर लाभ क्षेत्रातील गावांना जानेवारी २०२७ पासून मागणीनुसार पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल, असे जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी म्हटले आहे.
यामध्ये गावांचा समावेश आहे:
उजवा तीर कालवा: कुडासे, सासोली, परमे.
डावा तीर कालवा: मणेरी.
बांदा शाखा कालवा: नेतर्डे, गाळेल, बांदा, वाफोली, विलवडे, सरमळे, ओटवणे, इन्सुली, क्षेत्रफळ, निगुडे, शेर्ले, रोणापाल, मडुरे, कास, सातोसे आणि साटार्ड.
याबाबतची अधिकृत माहिती सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग (चराठे – सावंतवाडी) चे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.