सावंतवाडी : बंद केलेल्या एसटी बस पूर्ववत सुरू करा; गोविंद वाडकर यांची आमदार दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

शेअर करा

सावंतवाडी,दि.७ सप्टेंबर
सावंतवाडी एसटी डेपोतून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विविध मार्गांवरील बस फेऱ्या कोणतीही पूर्वसूचना न देता अकस्मात बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून बंद केलेल्या या एसटी बस फेऱ्या तत्काळ पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष व दलित मित्र गोविंद बाळा वाडकर यांनी आमदार तथा माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
​आमदार केसरकर यांना दिलेल्या निवेदनात वाडकर यांनी नमूद केले आहे की, सावंतवाडी डेपो हा जिल्ह्यातील सर्वाधिक रूट असलेला डेपो आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या डेपोतील अनेक महत्त्वाच्या गाड्या अचानक बंद करण्यात आल्या आहेत.
​निवेदनात प्रमुख मागण्या व समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे:
​दापोली बस सेवा: सावंतवाडी-दापोली ही गाडी अनेक दिवस बंद होती. आता ती दापोली डेपोने सुरू केली आहे. ही गाडी मूळची सावंतवाडी डेपोची असताना दापोली डेपोला का देण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
​उत्पन्न देणाऱ्या गाड्या बंद: अनेक वर्षे सुरू असलेली आणि डेपोला चांगला महसूल मिळवून देणारी सावंतवाडी-देवगड गाडी बंद करण्यात आली आहे.
​लांब पल्ल्याच्या गाड्या बंद: पणजी-गणपतीपुळे आणि पणजी-रत्नागिरी या गेल्या अनेक वर्षांपासून नियमित चालणाऱ्या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत.
​तिलारी-दोडामार्ग ते ओरोस नवीन बस सुरू करण्याची मागणी: तिलारी, भेडशी, दोडामार्ग येथून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस येथे थेट बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे सकाळी १० वाजेपर्यंत ओरोस येथे पोहोचणारी आणि संध्याकाळी ६ वाजता ओरोसहून सुटणारी नवीन बस सुरू करावी. ही वेळ शासकीय कर्मचारी व कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांसाठी सोयीची ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे.
​सावंतवाडी डेपोचे महत्त्व कमी करण्याचा तर हा डाव नाही ना, अशी शंका व्यक्त करत डेपोला अनेक वर्षे कार्यक्षम डेपो मॅनेजर उपलब्ध नाही, तसेच महत्त्वाच्या लाईनच्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सर्व बंद केलेल्या बस फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यासाठी वरिष्ठांना योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी गोविंद वाडकर यांनी आमदार केसरकर यांच्याकडे केली आहे.
​या निवेदनाच्या प्रती विभागीय कार्यालय कणकवली आणि डेपो मॅनेजर सावंतवाडी आगार यांनाही माहिती व कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

शेअर करा