सावंतवाडी,दि.२ जुलै
येथील बी. एस. बांदेकर महाविद्यालयात प्रख्यात शिल्पकार, नेपथ्यकार आणि सायकलपटू श्री. सचिन सूर्यकांत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी ‘माइंड क्रिएटिव्हिटी अँड स्टेज क्राफ्ट’ (Mind Creativity & Stage Craft) या विषयावर संवादात्मक सत्र उत्साहात पार पडले.
या सत्रादरम्यान श्री. गावकर यांनी सृजनशील विचार, रंगमंचीय नेपथ्याची प्रक्रिया, कला क्षेत्रातील विविध संधी आणि स्वतःचे व्यावसायिक अनुभव यांवर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. उदय वेले यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. चैताली परब आणि सुरज मळगांवकर यांनी केले.
मुंबईच्या प्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकेलेत सुवर्णपदकासह बी.एफ.ए. पदवी प्राप्त केलेले सचिन गावकर हे गेल्या दोन दशकांपासून चित्रकला, शिल्पकला, नाटक आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘करुणाष्टके’ या नाटकासाठी त्यांना नुकताच २०२६ चा झी गौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार पुरस्कार प्राप्त झाला आहे. याशिवाय ते मानसिक आरोग्य जनजागृतीच्या क्षेत्रातही मोठे योगदान देत आहेत.
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या ‘भावजागर’ उपक्रमाशी जोडलेले असलेले गावकर हे आगामी ऑक्टोबर २०२६ मध्ये ‘सुदृढ मन सर्वांसाठी’ हा संदेश घेऊन महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांची ‘एकल सायकल यात्रा’ करणार आहेत. या प्रवासातून ते मानसिक आरोग्य जनजागृती, चिकाटी, आत्मविश्वास आणि ध्येयपूर्तीचा संदेश देणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’च्या २५ व्या वर्षानिमित्त भारतातील २५ राज्यांमधून १३,००० किलोमीटरची ‘एकल भारत परिक्रमा’ यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या सायकल प्रवासातील त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. सिद्धेश नेरुरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.