१९ व २० ऑगस्टला सावंतवाडीत विविध कार्यक्रम
सावंतवाडी,दि.१४ ऑगस्ट
सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या १९ आणि २० ऑगस्ट रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत वृक्ष संवर्धन, दशावतारी कलाकारांना प्रोत्साहन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी दिली.
या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी संजू परब यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला सचिव प्रताप परब, ॲड. संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, सुनील खानोलकर, तारकेश सावंत, अशोक सांगेलकर, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता विजय चव्हाण, प्रमोद सावंत, हर्षवर्धन धारणकर, सुहास सावंत, गजानन बांदेकर, विभावरी सुकी, संदीप सुकी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आयोजित कार्यक्रमांनुसार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिर येथे कसई-दोडामार्ग येथील सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा ‘कृष्ण हनुमान युद्ध’ हा नाट्य प्रयोग होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ८:३० वाजता गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा सत्कार करण्यात येईल. यामध्ये संजू परब व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय चव्हाण यांचा विशेष गौरव होणार आहे.
तसेच २० ऑगस्ट रोजी पर्यावरण बचाव अभियानांतर्गत सकाळी १०:३० वाजता कलंबिस्त हायस्कूल आणि दुपारी १२ वाजता कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० सुपारीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.