सावंतवाडी,दि.७ ऑगस्ट
महिला सबलीकरणाला अधिक गती देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सक्षम स्त्री फाउंडेशन व माय ट्रॅव्हलाइट सखी इनिशिएटिव्हच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील ३०० हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, सक्षम स्त्री फाउंडेशनच्या अध्यक्ष नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक, माय ट्रॅव्हलाइट सखी इनिशिएटिव्हचे संचालक श्री. नितीन येरुणकर, श्री. निलेश उपाध्याय, सौ. रिद्धी कांबळी, उपाध्यक्ष नगरसेविका सौ. सुनीता पेडणेकर, सचिव सौ. मेघा राणे-गावडे, खजिनदार नगरसेविका सौ. दुलारी रांगणेकर आणि सहसचिव सौ. अंकिता बांदेकर-नेवगी उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. नीलम नाईक यांनी संस्थेचे महत्त्व व व्याप्ती विशद केली. शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा व करमणूक या समाजभिमुख घटकांशी संस्था निगडित असून महिला सबलीकरण हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा सौ. श्रद्धा राजे भोसले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. “महिला सक्षमीकरणाचे हे उद्दिष्ट अतिशय गौरवशाली आहे. अशा आगळ्यावेगळ्या आणि स्वागतार्ह उपक्रमांना आम्ही नेहमीच उत्तेजन व पाठबळ देऊ. पालिका व प्रशासन या फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
माय ट्रॅव्हलाइटचे संचालक यांनी पर्यटन क्षेत्रातील संधींवर प्रकाश टाकला. पर्यटनाच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या सहज आणि सोपा रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे सांगत त्यांनी या उपक्रमासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. खुशी नाईक व सौ. अंकिता बांदेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सचिव सौ. मेघा राणे-गावडे यांनी मानले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या ३०० हून अधिक महिलांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.